विठ्ठल दर्शनासाठी १६ तासांची प्रतीक्षा; वाखरीत पालख्या, पंढरपुरात भाविकांची प्रचंड गर्दी
सोलापूर : खरा पंचनामा
आषाढी वारीनिमित्त संतांच्या पालख्या पंढरपूरच्या वेशीवरील वाखरी येथे दाखल झाल्यानंतर श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात दर्शनासाठी भाविकांची प्रचंड गर्दी झाली आहे.
दर्शनरांग गोपाळपूरच्या पुढे पोहोचली असून, श्री विठ्ठलाचे पदस्पर्श दर्शन घेण्यासाठी भाविकांना सध्या सुमारे १६ तासांची प्रतीक्षा करावी लागत आहे. दिवसरात्र रांगेत उभे राहूनही विठुरायाच्या दर्शनासाठी भाविकांमध्ये मोठा उत्साह दिसून येत आहे. ऊन, वारा आणि पावसाचा सामना करत हजारो वारकरी व भाविक संयमाने दर्शनाची वाट पाहत आहेत. भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीने दर्शनरांगेचे सूक्ष्म नियोजन केले आहे. दर्शनरांगेसाठी कायमस्वरूपी चार आणि अतिरिक्त १६ अशा एकूण २० पत्राशेडची उभारणी करण्यात आली असून, त्यामुळे रांगेतील प्रवास अधिक सुरक्षित आणि सुसह्य झाला आहे.
दर्शनरांगेत भाविकांच्या सोयीसाठी सीसीटीव्ही कॅमेरे, दिशादर्शक व माहिती फलक, भक्तिगीतांसाठी अत्याधुनिक ध्वनी व्यवस्था, एलईडी व्हॅन व टीव्हीद्वारे थेट दर्शन, हरवले-सापडले केंद्र, फॅब्रिकेटेड शौचालये, जेटिंग व सक्शन मशिनद्वारे स्वच्छता व्यवस्था, आयसीयू व प्रथमोपचार केंद्र, पुरेसा वैद्यकीय कर्मचारी, सार्वजनिक सूचना प्रसारण प्रणाली, विश्रांती कक्ष, बसण्याची व्यवस्था, आपत्कालीन मार्ग, अग्निशमन सुविधा, आपत्कालीन प्रतिसाद केंद्र तसेच फॅन आणि कुलरची व्यवस्था करण्यात आली आहे. मंदिर समितीच्या या नियोजनामुळे मोठ्या गर्दीतही दर्शन व्यवस्था सुरळीत ठेवण्याचा प्रयत्न होत असून, भाविकांना सुरक्षित आणि सुलभ दर्शन मिळावे यासाठी प्रशासन युद्धपातळीवर कार्यरत आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.