उद्या जाहीर होणार शेतकरी कर्जमाफीची पहिली यादी, 30 जुलैपूर्वी खात्यात पैसे जमा होणार
मुंबई : खरा पंचनामा
राज्यातील लाखो शेतकऱ्यांसाठी महायुती सरकारने एक अत्यंत महत्त्वपूर्ण आणि मोठा दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज मुंबईत घेतलेल्या विशेष पत्रकार परिषदेत कर्जमाफीची अधिकृत घोषणा केली. त्यानुसार, योजनेसाठी पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांची पहिली प्राथमिक यादी उद्या, 22 जुलै 2026 रोजी अधिकृतपणे प्रसिद्ध केली जाणार आहे. दिवंगत नेते अजित पवार यांच्या जयंतीचे औचित्य साधून सरकारने हा निर्णय जाहीर केला आहे.
सरकारने यावेळच्या कर्जमाफी योजनेत काही महत्त्वाचे बदल केले असून, त्याचा थेट फायदा सामान्य शेतकऱ्यांना मिळणार आहे. शेतकऱ्यांना यापूर्वी केवळ 50 हजार रुपयांचे प्रोत्साहन अनुदान मिळत होते. मात्र, आता ही मर्यादा वाढवून थेट 2 लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी किंवा प्रोत्साहनपर लाभ देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.
सरकारने निकष सोपे केले आहेत. गेल्या तीन वर्षांच्या कालावधीत ज्या शेतकऱ्यांनी कोणतेही दोन वर्षे आपल्या कर्जाची नियमित परतफेड केली आहे, ते सर्व शेतकरी या योजनेसाठी पात्र मानले जातील. 30 जुलैपूर्वी थेट बँक खात्यात पैसे : छाननी प्रक्रिया पूर्ण झालेल्या सर्व पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 30 जुलै 2026 पूर्वी कर्जमाफीची रक्कम थेट (DBT द्वारे) वर्ग केली जाईल, अशी हमी मुख्यमंत्र्यांनी दिली आहे.
शेतकऱ्यांच्या आयकर परताव्याची आवश्यक माहिती राज्य शासनाला प्राप्त झाली आहे. या डेटाच्या आधारे बोगस लाभार्थी वगळून खऱ्या आणि गरजू शेतकऱ्यांची यादी अचूकपणे तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे.
या पत्रकार परिषदेत कृषिमंत्र्यांनी केवळ कर्जमाफीच नव्हे, तर चालू खरीप हंगामातील शेतकऱ्यांच्या इतर गंभीर समस्यांवरही भाष्य केले. राज्यात बनावट आणि निकृष्ट दर्जाच्या बियाण्यांमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. कृषी विभागाकडे आतापर्यंत बोगस बियाण्यांसंदर्भात तब्बल 11,584 तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. याची गंभीर दखल घेत सरकारने कडक पावले उचलली असून, आतापर्यंत 81 बियाणे उत्पादक कंपन्यांवर गुन्हे (FIR) दाखल करण्यात आले आहेत. यामध्ये विदर्भातील अकोला, अमरावती, बुलढाणा आणि यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये बनावट बियाण्यांचा प्रादुर्भाव सर्वाधिक पाहायला मिळाला असून, दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई सुरू असल्याचे कृषिमंत्र्यांनी स्पष्ट केले.
उद्या जाहीर होणाऱ्या पहिल्या यादीमुळे राज्यातील लाखो कर्जबाजारी शेतकऱ्यांना मोठा आर्थिक आधार मिळणार आहे. खरिपाच्या पेरण्या पूर्ण झाल्यानंतर आणि ऐन पावसाच्या हंगामात सरकारने घेतलेला हा निर्णय शेती क्षेत्राला गती देणारा ठरेल.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.