दानचोरी प्रकरणी नवी 'एसआयटी' स्थापन करा : सर्वोच्च न्यायालयाचे आदेश
नवी दिल्ली : खरा पंचनामा
राम मंदिर दानचोरी प्रकरणाच्या चौकशीसाठी वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्याच्य नेतृत्वाखाली नव्याने 'एसआयटी' स्थापन करावी, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने आज दिला. दान चोरीचे प्रकरण हे साधे गुन्हेगारीचे प्रकरण आहे. त्यामुळे निष्पक्षपणे चौकशी होणे गरजेचे असून या चौकशीचा तार्किक निष्कर्ष निघणेही तितकेच महत्त्वाचे आहे, अशी टिप्पणी खंडपीठाने केली.
विशेष तपास पथकामध्ये (एसआयटी) समावेश केल्या जाणाऱ्या अधिकाऱ्यांची नावे उत्तर प्रदेश सरकारकडून घेऊन या, असे निर्देश सरन्यायाधीश सूर्य कांत, न्या. जॉयमल्या बागची आणि न्या. व्ही. मोहना यांच्या खंडपीठाने सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांना दिले.
"दान चोरीच्या प्रकरणाला राजकीय रंग दिला जाऊ नये आणि न्यायालय हे राजकारण करण्याचे ठिकाण बनू नये. दान चोरीचे प्रकरण हे साधे गुन्हेगारीचे प्रकरण आहे. त्यामुळे याची निष्पक्ष चौकशी झाली पाहिजे," असे खंडपीठाने नमूद केले. उत्तर प्रदेश सरकारकडून यावेळी दान चोरी प्रकरणाच्या संदर्भातील स्थितीदर्शक अहवाल सादर करण्यात आला. या प्रकरणात आतापर्यंत आठ जणांना अटक झाली असल्याची माहिती राज्याने न्यायालयाला दिली आहे. तपास सुरू असल्यामुळे या प्रकरणाची जास्त माहिती दिली जाऊ शकत नाही, असे मेहता युक्तिवादात म्हणाले.
नव्याने स्थापन केल्या जाणाऱ्या 'एसआयटी' मध्ये आधीच्या 'एसआयटी'मधील अधिकाऱ्यांचा समावेश केला जाऊ शकतो, असे खंडपीठाने स्पष्ट केले. उत्तर प्रदेश सरकारने दाखल केलेला अहवाल आम्ही सविस्तर वाचू, असे सरन्यायाधीश सूर्य कांत यांनी सांगितले. मंदिरासाठी कोणी किती दान दिले, याची नोंद असू शकते. ती नोंद सार्वजनिक करण्याचे निर्देश दिले जावेत, अशी विनंती एका याचिकाकर्त्याची बाजू मांडताना विधिज्ञ देवदत्त कामत यांनी केली.
दानचोरीच्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात असंख्य याचिका दाखल झाल्या असून, बहुतांश याचिकांमध्ये हे प्रकरण 'सीबीआय'कडे दिले जावे, असे म्हटले आहे. या प्रकरणी पुढील सुनावणी येत्या २७ तारखेला होणार आहे. त्यावेळी नव्या 'एसआयटी'च्या स्थापनेवर विचार केला जाईल, असे न्यायालयाने सांगितले आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.