स्टॅच्यू ऑफ युनिटी'च्या धर्तीवर होणार छत्रपती संभाजी महाराजांचे स्मारक
350 कोटींचा विकास आराखडा तयार, उदय सामंतांची मोठी घोषणा
संगमेश्वर : खरा पंचनामा
रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर कसबा येथे छत्रपती संभाजी महाराज यांचे स्मारक उभारण्यासाठी सरकारने ३५० कोटी रुपयांचा विकास आराखडा तयार केला आहे. सध्या चार एकरवर हे स्मारक उभारण्यात येणार आहे. गरज पडल्यास अधिक जमीनही संपादित करण्यात येईल, अशी माहिती मंत्री डॉ. उदय सामंत यांनी विधानपरिषदेत दिली.
छत्रपती संभाजी महाराजांचे कोकणातील रत्नागिरी येथील कसबा (संगमेश्वर) गावात स्मारक उभारण्याचा राज्यशासनाने निर्णय घेतला आहे. त्यासाठी केवळ चार एकर जमीन संपादित केली जाणार आहे.
त्याऐवजी १०० एकर जमीन संपादित करून त्या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांचा स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या धर्तीवर पुतळा उभारण्यात यावा, त्या परिसरात आधुनिक संग्रहालय, इतिहास संशोधन, शिवकालीन इतिहासाचे दर्शन घडवणारे प्रकल्प उभारण्यात यावेत, अशी मागणी आमदार प्रमोद जठार यांनी केली. त्यावर मंत्री सामंत यांनी कसबा या ठिकाणी स्मारकासाठी अधिक जमीन उपलब्ध झाल्यास सरकार त्याचाही सकारात्मक विचार करेल, असे सांगितले.
तसेच स्मारकाच्या दुसऱ्या टप्प्यात परिसरातील डोंगराळ भाग आणि इतर आवश्यक जागा संपादित करण्याचा प्रस्ताव सादर करण्यात येणार असल्याचेही सांगितले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पीय भाषणात या स्मारकाची घोषणा केली आहे. त्यासाठी सुमारे ३५० कोटी रुपयांचा सविस्तर आराखडा तयार करण्यात आला आहे. मूळ वाड्याच्या परिसरात स्मारक उभारण्यास प्राधान्य देण्यात येणार आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.