पुढील 48 तास मुसळधार पावसाचा इशारा; 19 जिल्ह्यांना 'येलो' अलर्ट
मुंबई : खरा पंचनामा
भारतीय हवामान विभागाने (IMD) महाराष्ट्रासाठी पुढील ४८ तास अत्यंत महत्त्वाचे असल्याचा इशारा दिला आहे. आज २३ आणि उद्या २४ जुलैदरम्यान राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता असून, पुणे घाट क्षेत्रासाठी 'रेड' अलर्ट, तर पाच जिल्ह्यांसाठी 'ऑरेंज' आणि १९ जिल्ह्यांसाठी 'येलो' अलर्ट जारी करण्यात आला आहे. विशेषतः कोकण, पश्चिम घाट आणि उत्तर महाराष्ट्रातील काही भागांत मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
हवामान विभागाने कोकण किनारपट्टी वरील पालघर, रायगड, रत्नागिरी आणि नाशिक घाट परिसरासाठी 'ऑरेंज' अलर्ट दिला असून, या भागांत अतिवृष्टीची शक्यता आहे. तर ठाणे, मुंबई आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांसाठी 'येलो' अलर्ट जारी करण्यात आला आहे. कोकण किनारपट्टीवर ताशी ५० ते ६० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता असल्याने मच्छीमार आणि नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
पुणे घाट क्षेत्रासाठी 'रेड' अलर्ट जारी करण्यात आला असून, येथे अत्यंत मुसळधार पावसाचा अंदाज आहे. सातारा घाट परिसरात मुसळधार ते अति मुसळधार, तर कोल्हापूर घाट भागात मुसळधार पावसासाठी 'येलो' अलर्ट * देण्यात आला आहे. पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली आणि सोलापूरच्या इतर भागांत हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.
मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांत हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज असून, राज्यातील इतर भागांच्या तुलनेत येथे पावसाची तीव्रता कमी राहण्याची शक्यता आहे.
विदर्भातील अकोला, अमरावती, बुलढाणा, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशीम आणि यवतमाळ या जिल्ह्यांमध्येही पुढील दोन दिवस पावसाची शक्यता असल्याने 'येलो' अलर्ट लागू करण्यात आला आहे.
उत्तर महाराष्ट्रात धुळे, नंदुरबार, जळगाव आणि नाशिक जिल्ह्यांसाठी मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि मुसळधार पावसाचा 'येलो' अलर्टजारी करण्यात आला आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.