Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

महाराष्ट्रात भल्या पहाटे मोठं ऑपरेशन, 8 शहरात धडकली ATS ची 14 पथकं, 112 जण रडारवर

महाराष्ट्रात भल्या पहाटे मोठं ऑपरेशन, 8 शहरात धडकली ATS ची 14 पथकं, 112 जण रडारवर

मुंबई : खरा पंचनामा 

दहशतवाद विरोधी पथकाने (ATS) आज पहाटेपासून राज्यभरात एक अत्यंत मोठी कारवाई सुरू केली आहे. पाकिस्तानस्थित कुख्यात गैंगस्टर आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर शहजाद भट्टी याच्याशी सोशल मीडियाद्वारे कथित संपर्क असलेल्या संशयितांवर एटीएसने एकाच वेळी छापेमारी केली आहे. या कारवाईमुळे संपूर्ण महाराष्ट्रात प्रचंड खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी ७ वाजल्यापासून महाराष्ट्र एटीएसच्या एकूण १४ युनिट्सने राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये एकाच वेळी छापेमारी केली. मुंबई, नवी मुंबई, ठाणे, मिरा रोड, सांगली, सातारा आणि छत्रपती संभाजीनगर यांसारख्या प्रमुख शहरांमध्ये आणि परिसरांमध्ये एटीएसचे पथक धडकले आहे. या मोहिमेत आतापर्यंत तब्बल ११२ जणांची एटीएसकडून कसून चौकशी केली जात आहे.

पाकिस्तानातील गँगस्टर शहजाद भट्टीशी सोशल मीडियाच्या माध्यमातून संपर्कात आलेल्या व्यक्ती एटीएसच्या निशाण्यावर आहेत. संबंधित संशयित व्यक्तींचे मोबाईल फोन, लॅपटॉप्स, त्यांचे सोशल मीडिया अकाउंट्स आणि इतर डिजिटल पुराव्यांची कसून तपासणी केली जात आहे. या कारवाईत अद्याप कोणालाही अधिकृतपणे अटक करण्यात आलेली नाही. मात्र चौकशीतून मिळणाऱ्या माहितीच्या आणि पुराव्यांच्या आधारे पुढील कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचे एटीएस सूत्रांनी सांगितले आहे.

पाकिस्तानमध्ये बसलेला शहजाद भट्टी सोशल मीडियाच्या माध्यमातून भारतातील विशेषतः महाराष्ट्रातील तरुणांशी संपर्क साधत होता. तो या तरुणांना देशविरोधी कृत्यांसाठी प्रवृत्त करत असल्याचा तीव्र संशय तपास यंत्रणांना आहे. याच अनुषंगाने त्याच्या जाळ्यात ओढल्या गेलेल्या किंवा त्याच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींची पार्श्वभूमी आणि त्यांचा हेतू याची पडताळणी एटीएस करत आहे.

पाकिस्तानस्थित कुख्यात गँगस्टर असलेल्या शहजाद भट्टीने सुरुवातीला एक सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर म्हणून सुरुवात केली होती. तो यूट्यूब आणि टिकटॉकवर मोठ्या प्रमाणावर सक्रिय होता. तो सोशल मीडियावर '333' या नावाने आपले व्हिडिओ पोस्ट करत असे. यामध्ये प्रामुख्याने धर्म, भारत-पाकिस्तान संबंध आणि सोशल मीडियावरील विविध वादांवर आधारित प्रक्षोभक व्हिडिओंचा समावेश असायचा.

भट्टीचे पाकिस्तानची गुप्तहेर संघटना 'ISI' शी कथित संबंध असल्याचा आरोप आहे. यामुळेच तो भारतीय तपास यंत्रणांच्या रडारवर आला आहे. सोशल मीडियाद्वारे भारतातील तरुणांशी संपर्क साधून त्यांना दहशतवादी कारवाया, हेरगिरी आणि टार्गेट किलिंग सारख्या गंभीर गुन्ह्यांसाठी वापरले जात असल्याचा संशय आहे. महाराष्ट्रासह देशातील अनेक राज्यांमध्ये आता त्याच्या या कथित नेटवर्कचा तपास केला जात आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.