पाऊस, पुस्तके आणि आठवणी...
सांगली बुकीजच्या वाचन मैफलीला पुस्तकप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद
सांगली : खरा पंचनामा
सांगली बुकीजच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या "पाऊस, पुस्तके आणि आठवणी" या मान्सून स्पेशल वाचन मैफलीला गुरुवारी सायंकाळी कलाकार कट्टा, स्टोरी कॅफे (माळी चित्रमंदिर कंपाऊंड, सांगली) येथे उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. पावसाच्या सरी, गरमागरम चहा-कॉफी आणि पुस्तकांच्या सहवासात रंगलेल्या या आगळ्यावेगळ्या उपक्रमाने वाचनप्रेमींना एकत्र आणत वाचन संस्कृतीला नवी ऊर्जा दिली.
मोबाईलच्या आभासी जगापासून काही काळ दूर राहून पुस्तकांच्या विश्वात रमण्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला. उपस्थितांनी आपल्या आवडत्या पुस्तकांचे वाचन केले, पुस्तकांवरील अनुभव आणि विचार मांडले तसेच विविध साहित्यकृतींवर मुक्त संवाद साधला. चहा-कॉफीच्या प्रत्येक घोटासोबत पुस्तकांच्या सहवासाचा आनंद घेत साहित्यप्रेमींनी संस्मरणीय संध्याकाळ अनुभवली.
यावेळी कवयित्री अमिता शाह, आनंदराव जाधव, बिना इनामदार, सुमेधा दातार, दीपक निर्मळे, राजेश पोळ, रक्षदा औताडे, अनिल पाटील, जोहेब मुल्ला, स्नेहल निर्मळे आणि श्रीदेव साळुंखे यांची विशेष उपस्थिती लाभली. उपस्थित साहित्यप्रेमींनी वाचन संस्कृती अधिक समृद्ध करण्यासाठी अशा उपक्रमांची गरज असल्याचे मत व्यक्त केले. उपक्रमाच्या शेवटी अमिता शाह व आनंदराव जाधव यांनी विशेष कविता सादर केल्या.
या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सुदर्शन चोरगे, संभाजी दाणेकरी, सुजाता मराठे, पूजा शाह, अमेय गाट, सुहास गवळी, ॲड. आसिफ मुजावर, इंद्रायणी महाजन, शुभम बनसोडे आणि रोहन ऐवळे यांनी नियोजनाची जबाबदारी प्रभावीपणे सांभाळली.
सांगली बुकीजतर्फे भविष्यातही अशाच स्वरूपाच्या वाचन चळवळीचे उपक्रम नियमितपणे राबविण्यात येणार असून अधिकाधिक नागरिकांनी या वाचन चळवळीत सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.