लोणावळ्यात भुशी धरण ओव्हरफ्लो; पर्यटकांची गर्दी वाढली
लोणावळा : खरा पंचनामा
लोणावळा शहरामधील पावसाळी पर्यटनाचे मुख्य केंद्र आणि पर्यटकांचे आकर्षण स्थळ असलेले भुशी धरण शुक्रवार (दि. ३) रोजी अखेर ओव्हरफ्लो झाले आहे. भुशी धरण पूर्ण भरून वाहू लागल्याची बातमी समजताच, पर्यटकांनी धरण परिसराकडे धाव घेत मोठी गर्दी केली होती.
लोणावळा शहर परिसरात गेल्या चार ते पाच दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. २ जुलै रोजी संपलेल्या २४ तासांत शहरात तब्बल ११६ मिली मीटर पावसाची नोंद झाली. यंदा जून महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात हजेरी लावणाऱ्या पावसाने नंतर विश्रांती घेतली होती. त्यानंतर ३० जूनपासून पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढला. सलग चार दिवस पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे धरणाच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ झाली आणि शुक्रवारी धरण ओव्हरफ्लो झाले. भुशी धरणाच्या पायऱ्यांवर बसून वर्षाविहाराचा आनंद घेण्यासाठी लाखो पर्यटक दरवर्षी भुशी धरणावर येत असतात. धरण भरल्यामुळे धरणाच्या सांडव्यावरून पायऱ्यांवर पाणी वाहते व या वाहत्या पाण्यामध्ये बसून भिजण्याचा आनंद पर्यटक घेत असतात.
लोणावळा धरणासमोरील डोंगरावरून पांढरे शुभ्र धबधबे खळखळून वाहू लागले आहेत. या निसर्गरम्य वातावरणाचा आणि धबधब्याखाली भिजण्याचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांनी सहारा पुलावर एकच गर्दी केली आहे. आज सकाळपासूनच पर्यटकांचा ओघ सुरू झाला असून, शनिवार आणि रविवारी वीकेंडला येथे हजारोंच्या संख्येने पर्यटक येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
शनिवार आणि रविवारी मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्ग तसेच भुशी धरणाकडे जाणाऱ्या मार्गांवर प्रचंड वाहतूक कोंडी होते. ही समस्या सोडवण्यासाठी लोणावळा नगरपरिषद कार्यालयात लोणावळा शहर पोलीस, नगरपरिषद प्रशासन आणि स्थानिक लोकप्रतिनिधींची एक महत्त्वपूर्ण आढावा बैठक पार पडली. या बैठकीत वाहतूक कोंडीवर नियंत्रण मिळवण्यासाठी विविध पर्यायांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. लवकरच प्रत्यक्ष स्पॉट पाहणी करून वाहतूक नियोजनाची अंमलबजावणी केली जाणार आहे.
भुशी धरण भरल्याच्या पार्श्वभूमीवर आणि पर्यटकांची संभाव्य गर्दी लक्षात घेता, कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी लोणावळा शहर पोलीस दल पूर्णपणे सज्ज झाले आहे. पर्यटन स्थळांवर पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. लोणावळा शहरचे पोलीस निरीक्षक सचिन पाटील यांनी पर्यटकांना सुरक्षिततेच्या दृष्टीने दिलेल्या नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन केले आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.