Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

रमेश म्हात्रे यांना दणका; जामिनाला स्थगिती, शरण येण्याचे आदेश

रमेश म्हात्रे यांना दणका; जामिनाला स्थगिती, शरण येण्याचे आदेश

मुंबई : खरा पंचनामा 

कल्याण डोंबिवली महापालिका रुग्णालयातील तीन डॉक्टरांवर हल्ला केल्याप्रकरणी शिवसेनेचे नगरसेवक रमेश म्हात्रे यांना उच्च न्यायालयाने दणका दिला. कल्याण दंडाधिकारी न्यायालयाने दिलेल्या जामिनाला उच्च न्यायालयाने शनिवारी (ता. १८) विशेष सुनावणी घेऊन स्थगिती दिली. तसेच म्हात्रेना रविवारी (ता. १९) सायंकाळी पाच वाजेपर्यंत पोलिसांना शरण येण्याचे आदेश देताना आदेशाचे पालन न केल्यास त्यांच्या स्थावर मालमत्ता जप्त करण्याची प्रक्रिया सुरू करण्याचा इशाराच न्यायालयाने दिला.

म्हात्रे यांच्यासह चार साथीदारांना जामीन मिळाल्याच्या निषेधार्थ राज्यभरातील डॉक्टरांनी २० जुलैला काम बंदची हाक दिली आहे. त्या पार्श्वभूमीवर प्रभारी मुख्य न्या. रवींद्र घुगे आणि न्या. गौतम अंखड यांच्या खंडपीठाने स्वतःहून (सूओमोटो) दखल घेऊन शनिवारी तातडीची सुनावणी घेतली. म्हात्रे यांच्या जामिनाला स्थगितीचे आदेश दिले.

म्हात्रे यांना जवळपास सगळ्याच जामिनाच्या अर्टीतून मोकळीक देण्यात आली होती. त्यांना ठरावीक तारखांना किंवा आठवड्यातील विशिष्ट दिवशी संबंधित पोलिस ठाण्यात हजेरी लावण्याचे किंवा तपासात सहकार्य करण्याचे आदेश दंडाधिकाऱ्यांनी न दिल्याने खंडपीठाने आश्चर्य व्यक्त केले. म्हात्रेच्या हालचालींवर तपास यंत्रणेला लक्ष ठेवण्याबाबत कोणत्याही अटीचा आदेशात उल्लेख नाही. याच कारणास्तव म्हात्रेच्या जामिनाला स्थगिती देत असल्याचे न्यायालयाने नमूद केले.

जोपर्यंत जामीन मंजूर झाला नव्हता तोपर्यंत म्हात्रे रुग्णालयात दाखल होते आणि ज्या क्षणी जामीन मंजूर झाला त्याच क्षणी म्हात्रे रुग्णालयातून सुट्टी मिळण्याइतके ठणठणीत बरे झाले. नेहमी असेच चालते, अशी तोंडी टिप्पणीही प्रभारी मुख्य न्या. रवींद्र घुगे यांनी केली.

समाजाचे व्यापक हित आणि मानवतेची सेवा यांचा विचार करून २० जुलैला घेण्यात आलेल्या संपाच्या निर्णयाचा पुनर्विचार करावा, असे आवाहन प्रभारी मुख्य न्या. घुगे यांनी सरकारी आणि महापालिकेच्या रुग्णालयांमधील सर्व डॉक्टरांना केले.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.