Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

विठ्ठल दर्शनासाठी प्रतीक्षा चार तासांवर; व्हीआयपी दर्शन बंदचा सकारात्मक परिणाम; भाविकांना दिलासा

विठ्ठल दर्शनासाठी प्रतीक्षा चार तासांवर; व्हीआयपी दर्शन बंदचा सकारात्मक परिणाम; भाविकांना दिलासा

पंढरपूर : खरा पंचनामा 

श्री विठ्ठल- रुक्मिणी मंदिरातील व्हीआयपी दर्शन सुविधा बंद केल्यामुळे दर्शन रांगेतील भाविकांना अधिक जलद आणि सुलभ दर्शन होत आहे. पूर्वी पदस्पर्श दर्शनासाठी आठ ते दहा तास प्रतीक्षा करावी लागत होती. आता अवघ्या चार ते पाच तासांत दर्शन होत असल्याने भाविकांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे.

आषाढी यात्रेनिमित्त लाखो भाविक पंढरपुरात दाखल झाले असून, पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या सूचनेनुसार जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी १५ जुलैपासून व्हीआयपी दर्शन व्यवस्था पूर्णपणे बंद केली आहे. मंदिर समितीकडून या निर्णयाची काटेकोर अंमलबजावणी केली जात असून, शुक्रवारी दर्शनरांगेत सुमारे ३० ते ३५ हजार भाविक होते.

जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी कोणत्याही परिस्थितीत व्हीआयपी दर्शन दिले जाणार नसल्याचे स्पष्ट केले. दर्शनाचा कालावधी आणखी कमी करण्यासाठी प्रयत्न सुरू असून, भाविकांसाठी पिण्याचे पाणी, हिरकणी कक्ष, भोजन, चहा-नाश्ता आदी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, जिल्हाधिकाऱ्यांनी वाखरी येथील पालखी तळाची पाहणी करून संबंधित अधिकारी व ठेकेदारांना आवश्यक सूचना दिल्या. वाखरी चौकातील जोडरस्त्याच्या दुरुस्तीचेही निर्देश त्यांनी दिले. यावेळी तहसीलदार सचिन लंगुटे, मुख्याधिकारी महेश रोकडे, कार्यकारी अभियंता निमकर आदी उपस्थित होते.

वारीतील कामांचे 'थर्ड पार्टी' ऑडिट आषाढी यात्रेसाठी विविध विभागांनी केलेल्या कामांबाबत आलेल्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर वारीनंतर सर्व कामांचे 'थर्ड पार्टी' ऑडिट करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी दिली. वाखरी येथील सेवा रस्त्याच्या निकृष्ट कामाबाबत संबंधित ठेकेदाराला नोटीस देण्यात आली असून, नुकसानग्रस्त रस्त्याची दुरुस्तीही करून घेण्यात आली आहे. पालखी तळावर पाणी साचू नये म्हणून तात्पुरती उपाययोजना करण्यात आली असून, भविष्यात त्या ठिकाणी कायमस्वरूपी मोठे गटार उभारण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

आषाढी शुद्ध एकादशी २५ जुलै रोजी असून, श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या पदस्पर्श दर्शनासाठी भाविकांची पंढरपुरात मोठी गर्दी होत आहे. दर्शनरांगेतील भाविकांना सुलभ व जलद दर्शन मिळावे, यासाठी आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरातील व्हीआयपी दर्शनाबाबत आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत तसेच राज्य शासनाच्या निर्णयानुसार जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी व्हीआयपी दर्शन बंद करण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशाची प्रत्यक्ष अंमलबजावणी होत आहे की नाही, याची पाहणी जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी आज केली. जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी स्वेरी कॉलेज ते श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरापर्यंत चालत पाहणी केली. यावेळी मंदिर समितीकडून दर्शनरांग व पत्राशेड येथे भाविकांच्या सुविधेसाठी करण्यात आलेल्या व्यवस्थेची त्यांनी पाहणी केली. तसेच दर्शनरांगेतील भाविकांशी संवाद साधून उपलब्ध सुविधा आणि दर्शनव्यवस्थेबाबत माहिती घेतली. दर्शनरांगेतील भाविकांना सुलभ व जलद दर्शन मिळावे, यासाठी समितीने दर्शनरांगेत घुसखोरी होणार नाही, याची दक्षता घेऊन आवश्यक सुरक्षा रक्षक नियुक्त करावेत, अशा सूचना त्यांनी दिल्या.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.