उजनी धरणाच्या पाणीपातळीत कमालीची वाढ
पुणे : खरा पंचनामा
पुणे जिल्हा आणि घाटमाथ्यावर उजनी धरणाच्या पाणीपातळीत झालेल्या मुसळधार पावसामुळे सोलापूरची वरदायिनी असलेल्या उजनी धरणाच्या पाणीपातळीत कमालीची वाढ झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून उणे (मायनस) पातळीत असलेले उजनी धरण अखेर 'प्लस' (अधिक) मध्ये आले असून सोलापूरकरांना मोठा दिलासा मिळाला आहे.
काही दिवसांपूर्वी उणे २७ टक्क्यांपर्यंत खाली गेलेला उजनीचा पाणीसाठा आता झपाट्याने वाढत आहे. पुणे आणि भीमा खोऱ्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे धरणात पाण्याचा प्रचंड विसर्ग सुरू आहे. बुधवारी (८ जुलै) सायंकाळपर्यंत उजनी धरणातील उपयुक्त जलसाठा १७.२५ टक्क्यांवर पोहोचला होता, तर आज (९ जुलै) हा साठा २५ टक्क्यांपर्यंत जाण्याची दाट शक्यता आहे.
अवघ्या ४-५ दिवसांपूर्वी उजनी धरण मायनसमध्ये होते. परंतु, भीमाशंकर, लोणावळा आणि मावळ भागातील पावसामुळे इंद्रायणी आणि मुळा-मुठा नद्यांना पूर आहे. हे सर्व पाणी दौंडमार्गे उजनी जलाशयात मिसळत आहे. सुरुवातीला दौंडमधून तब्बल १ लाख ६४ हजार क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू होता. आता पाऊस काहीसा ओसरल्याने हा विसर्ग सुमारे ९२,८९२ क्युसेकवर आला आहे. धरण १००% भरण्यासाठी अजूनही साधारण ५० टीएमसी पाण्याची आवश्यकता आहे.
आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर येथे चंद्रभागा नदीत पाणी सोडण्यासाठी आधी उजनी धरणाचा विचार केला जात होता. मात्र, आता वीर धरणातून नीरा नदीत ६,०३७ क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. हे पाणी नीरा नरसिंहपूर येथे भीमा नदीत मिसळणार असल्याने आषाढी वारीसाठी पंढरपुरात चंद्रभागा नदी प्रवाहित होणार आहे. वीर धरणही सध्या ८७.२७% भरले आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.