आष्टा एस. टी. स्टँडवरील दागिने चोरीचा गुन्हा उघडकीस;
स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून कोल्हापूर जिल्ह्यातील रेकॉर्डवरील महिला आरोपी जेरबंद
पूजा फडके
सांगली : खरा पंचनामा
आष्टा एस. टी. स्टँडवर बसमध्ये चढताना एका महिला प्रवाशाचे सोन्याचे दागिने लांबवणाऱ्या परजिल्ह्यातील सराईत गुन्हेगार महिलेला जेरबंद करण्यात सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला (LCB) यश आले आहे. या कारवाईत पोलिसांनी १,४०,१८० रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
मिरज येथील रहिवासी रोहिणी हौसेराव बल्लाळ या दिनांक १४ जुलै २०२६ रोजी सकाळी ११:५० ते १२:३० च्या सुमारास आष्टा एस. टी. स्टँडवर बसमध्ये चढत होत्या. त्यावेळी त्यांच्या बॅगमधील पर्समधून १० ग्रॅम वजनाचे सोन्याचे गंठण चोरीला गेले होते. याप्रकरणी आष्टा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्ह्याचा छडा कसा लागला?
सांगलीचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे आणि पोलीस उपनिरीक्षक महादेव पोवार यांच्या पथकाने या प्रकरणी शोध सुरू केला होता.
पेट्रोलिंगदरम्यान पथकाला गोपनीय बातमीदाराकडून माहिती मिळाली की, रेकॉर्डवरील एक महिला सांगली बसस्थानक परिसरात चोरीचे दागिने विक्रीसाठी येणार आहे. माहिती मिळताच पथकाने सांगली बसस्थानक परिसरात सापळा रचून कृष्णा बंगल्याच्या भिंतीजवळ संशयितरीत्या थांबलेल्या महिलेला ताब्यात घेतले. महिला पोलीस अंमलदार सपना गराडे व सुनिता शेजाळे यांच्या मदतीने तिची अंगझडती घेतली असता तिच्याकडील पिशवीत रुमालामध्ये बांधलेले सोन्याचे गंठण आणि रोख रक्कम मिळून आली.
आरोपीचे नाव कामिना प्रकाश चौगुले (वय ३९ वर्षे, रा. बेघर वसाहत, शाहूनगर, कागल, जि. कोल्हापूर) असे असून जप्त केलेला मुद्देमाल
१० ग्रॅम वजनाचे सोन्याचे गंठण (किंमत रु.१,४०,०००/-), रोख रक्कम (रु. १८०/-)
एकूण मुद्देमाल: रु. १,४०,१८०/- असा आहे.
चौकशीदरम्यान आरोपी कामिना चौगुले हिने आष्टा एस. टी. स्टँडवर महिलेच्या बॅगमधून दागिने चोरी केल्याची कबुली दिली आहे. ही महिला पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार असून तिच्यावर यापूर्वी सांगली व कोल्हापूर जिल्ह्यात चोरीचे अनेक गुन्हे दाखल आहेत.
पुढील कायदेशीर कारवाईसाठी आरोपी व जप्त केलेला मुद्देमाल आष्टा पोलीस ठाण्याच्या स्वाधीन करण्यात आला आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.