Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

जुनीधामणी सांडपाणी योजनेवरील साहित्य चोरणारी टोळी गजाआड२४ तासांत सांगली ग्रामीण पोलिसांची कारवाई

जुनीधामणी सांडपाणी योजनेवरील साहित्य चोरणारी टोळी गजाआड
२४ तासांत सांगली ग्रामीण पोलिसांची कारवाई

पूजा फडके 
सांगली : खरा पंचनामा 

सांगली ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जुनीधामणी (ता. मिरज) येथील शासकीय सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्पातून साहित्य चोरी करणाऱ्या दोन संशयित आरोपींना अवघ्या २४ तासांच्या आत गजाआड करण्यात सांगली ग्रामीण पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेला यश आले आहे. पोलिसांनी आरोपींकडून दुचाकीसह ६५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

जुनीधामणी येथील संजीवनी फार्महाऊसच्या पाठीमागे शासकीय सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्पाचे काम सुरू आहे. दि. २७ जुलै २०२६ रोजी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास या कामावरील पाणी उपसा करणारा पंप, दोन पांढऱ्या रंगाचे फोल्डिंग पाईप आणि लोखंडी सळ्यांचा बंडल चोरट्यांनी पळवून नेला होता. याप्रकरणी प्रांजल संजय वाठारकर (वय ३४, रा. उरुण ईश्वरपूर, ता. वाळवा) यांनी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यावरून भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०३(२) आणि ३(५) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला होता.

गुप्त माहितीच्या आधारे बेड्या
गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक तुषार दोषी, अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारावकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप भागवत यांच्या सूचनेनुसार पोलीस निरीक्षक अभिजीत देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने तपास चक्र फिरवली.

तपासादरम्यान गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाला गोपनीय बातमीदाराद्वारे माहिती मिळाली की, चोरीचा माल विकण्यासाठी दोघे जण अंकली येथील सांगली-कोल्हापूर रस्त्यावरील सागर भवनजवळ उभे आहेत. त्यानुसार पोलिसांनी तातडीने सापळा रचून आरोपींना ताब्यात घेतले. कसून चौकशी केली असता त्यांनी चोरीची कबुली देत मुद्देमाल काढून दिला.

अटक करण्यात आलेले आरोपी अक्षय अनिल कोळी (वय ३० वर्षे), अनिल मारुती कोळी (वय ४३ वर्षे, दोघे रा. ग्रामपंचायतीजवळ, जुनीधामणी, ता. मिरज, जि. सांगली) असे आहेत.

पोलीस कारवाईत चोरी करताना वापरलेली HF Deluxe मोटारसायकल (किंमत रु. ५०,०००/-), बलवान कंपनीचा पाणी उपसा करण्याचा पंप (किंमत रु. १०,०००/-), दोन फोल्डिंग पाईप (किंमत रु. ४,०००/-) आणि सळीचा बंडल (किंमत रु. १,०००/-) असा एकूण ६५,०००/- रुपयांचा ऐवज पोलिसांनी जप्त केला आहे.

ही कामगिरी पोलीस अधीक्षक तुषार दोषी, अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारावकर, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अभिजीत देशमुख, सहा. पोलीस फौजदार मेघराज रुपनर, अरुण औताडे, पोलीस हेडकॉन्स्टेबल बंडू पवार, अभिजीत पाटील व शेखर पवार यांच्या पथकाने केली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल अभिजीत पाटील करत आहेत.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.