अभिजीत दिपकेंची प्रकृती बिघडली; 'या' आजाराचं झालं निदान, आंदोलन सोडणार?
नवी दिल्ली : खरा पंचनामा
दिल्लीतील जंतर मंतर येथे कॉक्रोच जनता पार्टीचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाचे नेतृत्व करणारे अभिजीत दिपके यांच्या प्रकृतीबाबत चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. गेल्या महिनाभरापासून सुरू असलेले विद्यार्थी आंदोलन अधिक तीव्र झाले असतानाच अभिजीत दिपके यांची प्रकृती पुन्हा एकदा बिघडली असून, याबाबत त्यांनी स्वतः एक्सवरुन व्हिडिओ शेअर करत माहिती दिली आहे.
वैद्यकीय तपासणीनंतर त्यांना टायफॉईडचे निदान झाले असून, ते आंदोलनापासून दूर राहणार असल्याचे बोलले जात आहे. या आजाराचे निदान झाल्याचे सांगत अभिजीत दिपकेंनी व्हिडिओतून आंदोलन सुरूच ठेवण्याचे आवाहन आंदोलनकर्त्यांना केले आहे. तसेच प्रकृती सुधारल्यानंतर पुन्हा सक्रियपणे आंदोलनात सहभागी होणार असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.
नीट-यूजी परीक्षा गैरव्यवहाराच्या निषेधार्थ सुरू असलेल्या आंदोलनात अभिजीत दिपके यांनी आमरण उपोषण सुरू केले होते. मात्र, सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या विनंतीनंतर त्यांनी ज्यूस पिऊन उपोषण मागे घेतले. आंदोलन प्रभावीपणे पुढे नेण्यासाठी कार्यकर्त्यांनी स्वतःच्या आरोग्याची काळजी घेणेही तितकेच महत्त्वाचे असल्याचा सल्ला वांगचुक यांनी दिला होता. उपोषण सोडल्यानंतर काही दिवसांतच अभिजीत दिपके यांची प्रकृती खालावल्याची माहिती समोर आली होती.
CJP च्या धरणे आंदोलनाला आता ३६ दिवस पूर्ण झाले आहेत. आंदोलनकर्ते आणि केंद्र सरकार यांच्यात चर्चेच्या अनेक फेऱ्या झाले आहेत. मात्र, तोडगा निघू शकलेला नाही. आंदोलनकर्ते केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा या प्रमुख मागणीवर ठाम आहेत. या मागणीवर केंद्राकडून ठोस निर्णयाची अपेक्षा विद्यार्थ्यांकडून व्यक्त केली जात आहे. यापूर्वी केंद्रीय मंत्री जेपी नड्डा आणि जितेंद्र सिंह यांनी CJP च्या प्रतिनिधींशी चर्चा केली होती. सरकारकडून पुढील भूमिका स्पष्ट केली जाईल, असे आश्वासन देण्यात आले होते.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.