अखेर सरन्यायाधीश सूर्यकांत झाले तयार, कॉक्रोच आंदोलकांसाठी सुप्रीम कोर्टातून मोठी बातमी
नवी दिल्ली : खरा पंचनामा
नीट पेपर लिक प्रकरणी दिल्लीमध्ये विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरूच आहे. सोनम वांगचुक यांनी उपोषण सोडल्यानंतरही आंदोलक आपल्या भूमिकेवर ठाम आहे. तर कालपर्यंत दिल्ली पोलिसांनी केलेल्या लाठीचार्ज प्रकरण ऐकून घेण्यास तयार नसणारे सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी याचिका ऐकून घेण्यास सहमती दर्शवली आहे. त्यामुळे आता कॉक्रोच पार्टीची न्यायालयीन लढाई सुरू झाली आहे.
२० जुलै रोजी दिल्लीतील जंतर-मंतरवर मोर्चा निघाला होता. यावेळी दिल्ली पोलिसांनी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर अमानुषपणे लाठीमार केला होता. अनेक विद्यार्थी जखमी झाले होते. या प्रकरणी दुसऱ्याच दिवशी सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करण्यात आली होती. पण, या याचिकेवर भारताचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी आमच्याकडे वेळ नाही, व्हिडीओ पाहणार नाही, अशी भूमिका घेऊन सुनावणी घेण्यास नकार दिला होता.
सर्वोच्च न्यायालयाने याचिका नाकारल्यामुळे देशभरात वेगवेगळे पडसाद उमटले. सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थितीत झाले होते. पण, आता सर्वोच्च न्यायालयाने सुनावणी घेण्यास सहमती दर्शवली आहे. दाखल याचिकेवर सर्वोच्च न्यायालय २७ जुलै (सोमवार) रोजी सुनावणी घेणार आहे. भारताचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमल्या बागची आणि न्यायमूर्ती व्ही. मोहन यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाचा उल्लेख करण्यात आला होता. त्यामुळे आता सर्वोच्च न्यायालयामध्ये काय सुनावणी होणार याकडे सगळ्यांचं लक्ष्य लागलं आहे.
दरम्यान, दिल्लीतील जंतर-मंतर परिसरात झालेल्या CJP आंदोलनादरम्यान पोलिसांकडून आंदोलकांवर कथित पाळत ठेवण्यात आल्याच्या आरोपांवर दिल्ली उच्च न्यायालयात आज सुनावणी सुरू आहे. माजी जेएनयू विद्यार्थी संघ अध्यक्षा आयशी घोष यांनी दाखल केलेल्या जनहित याचिकेवर मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय आणि न्यायमूर्ती तेजस करिया यांच्या खंडपीठासमोर सुनावणी होत आहे. या याचिकेत आंदोलनकर्त्यांच्या गोपनीयतेचा आणि घटनात्मक अधिकारांचा मुद्दा उपस्थित करण्यात आला असून, पोलिसांच्या कथित सर्व्हेलन्सच्या वैधतेवर न्यायालयात सुनावणी सुरू आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.