देशभरातील ५८ इंजिनिअरिंग महाविद्यालये बंद
यादीत महाराष्ट्र टॉपवर
दिल्ली : खरा पंचनामा
जर तुम्ही इंजिनिअरिंगचे विद्यार्थी असाल किंवा यावर्षी प्रवेश घेण्याचा विचार करत असाल, तर तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आणि तितकीच धक्कादायक बातमी आहे. देशभरातील तब्बल ५८ इंजिनिअरिंग आणि तंत्रशिक्षण महाविद्यालये बंद करण्याचा निर्णय 'ऑल इंडिया कौन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन' (AICTE) ने घेतला आहे. धक्कादायक बाब म्हणजे, महाविद्यालय बंद होण्याच्या या यादीत महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश दोघेही अव्वल स्थानी आहेत.
AICTE ने दिलेल्या माहितीनुसार, या ५८ महाविद्यालयांमध्ये शैक्षणिक वर्ष २०२५-२६ पासून 'प्रोग्रेसिव्ह क्लोजर' म्हणजेच टप्प्याटप्प्याने बंद करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. याशिवाय, विविध कॉलेजेस मधील तब्बल ९५० पेक्षा जास्त अभ्यासक्रम देखील कायमचे बंद करण्यात आले आहेत.
या निर्णयामुळे विद्यार्थ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले असले, तरी घाबरण्याचे कारण नाही. AICTE ने स्पष्ट केले आहे की, ज्या कॉलेजना 'प्रोग्रेसिव्ह क्लोजर' मंजूर झाले आहे, त्यांना यावर्षीपासून पहिल्या वर्षासाठी नवीन विद्यार्थ्यांना प्रवेश देता येणार नाही. मात्र, जे विद्यार्थी आधीपासूनच तिथे शिकत आहेत, त्यांना त्यांचे शिक्षण पूर्ण करण्याची पूर्ण परवानगी असेल. त्यांचे नुकसान होणार नाही याची काळजी घेतली जाईल.
बंद झालेल्या ५८ संस्थांमध्ये खाजगी महाविद्यालयांची संख्या सर्वाधिक आहे. एकूण संस्थांपैकी फक्त ३ सरकारी अनुदानित आहेत, तर बाकी सर्व खाजगी आहेत. राज्यांचा विचार केला तर महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश मध्ये प्रत्येकी १२ महाविद्यालये बंद करण्यात आली आहेत. मध्य प्रदेशमध्ये ८ महाविद्यालये, तेलंगणा आणि पंजाब मध्ये प्रत्येकी ४ महाविद्यालये आंध्र प्रदेश आणि राजस्थान मध्ये प्रत्येकी ३ महाविद्यालये, गुजरात आणि कर्नाटक मध्ये प्रत्येकी २ महाविद्यालये याशिवाय पुणे, तामिळनाडू, हरियाणा, ओडिशा, उत्तराखंड आणि पश्चिम बंगालमध्ये प्रत्येकी १ कॉलेज बंद झाले आहे.
AICTE ही देशातील तंत्रशिक्षणाचे नियमन करणारी सर्वोच्च संस्था आहे. महाविद्यालय बंद करण्यामागे खालील प्रमुख कारणं समोर आली आहेत.
१. अनेक कॉलेजेसमध्ये गेल्या काही वर्षांत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या कमालीची घटली होती.
२. नियमाप्रमाणे आवश्यक असलेले पात्र प्राध्यापक टिकवून ठेवण्यात महाविद्यालये अपयशी ठरलीत.
३. लायब्ररी, लॅब आणि इतर पायाभूत सुविधांच्या नियमांचे पालन न करणे.
जर एखादे महाविद्यालय पूर्णपणे बंद झाले, तर तिथल्या विद्यार्थ्यांना दुसऱ्या कॉलेजमध्ये ट्रान्सफर केले जाते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी प्रवेश घेताना महाविद्यालयाचे स्टेटस तपासून घेणे गरजेचे आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.