महापालिकेच्या उद्यानात गांजाची शेती ! नागरिक व प्रशासनात खळबळ
नागपूर : खरा पंचनामा
सध्या शहरात गांजा विक्रेत्यांनी धुमाकूळ घातला असून पोलिसांची झोप उडाली आहे. त्यातच आता महापालिकेच्या उद्यानात चक्क गांजाची झाडे असल्याचा दावा नागरिकांनी केला. त्यामुळे प्रशासनात खळबळ उडाली आहे. उद्यानात येणाऱ्या नागरिकांनी या झाडाची चित्रफित तयार करून समाजमाध्यमावर प्रसारित केल्याने संपूर्ण शहरात उद्यानात गांजाच्या शेतीची चर्चा रंगली आहे.
महापालिकेच्या गजानननगर येथील सार्वजनिक उद्यानात गांजाची झाडे आढळल्याने खळबळ उडाली आहे. यानिमित्त उद्यान विभागाकडून झाडांच्या देखरेखीबाबत गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. स्थानिक नागरिकांनी लक्ष्मीनगर झोनअंतर्गत गजानननगरातील उद्यानात गांजाची झाडे आढळल्याचा दावा करत त्याचे मोबाईलमध्ये चित्रीकरण केले. त्यानंतर हा प्रकार समोर आला.
नागरिकांच्या म्हणण्यानुसार, रात्रीच्या वेळी समाजकंटक आणि काही तरुण या उद्यानात नियमितपणे वावरत असल्याच्या तक्रारी अनेक महिन्यांपासून करण्यात येत होत्या. लक्ष्मीनगरच्या झोन सभापती लक्ष्मी यादव यांनीही यास दुजोरा दिला. त्यांचे पुत्र करण यादव यांनी उद्यानाची पाहणी केल्यानंतर जॉगिंग ट्रॅकजवळील मोगऱ्याच्या झुडपांमध्ये अनेक संशयित गांजाची झाडे लपवून ठेवण्यात आल्याचा दावा केला. लक्ष्मी यादव यांनी महापालिका आणि पोलिसांनी या मागील शोध घेऊन संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली. सार्वजनिक उद्यानांमध्ये सुरक्षारक्षकांची नियुक्ती करावी व सीसीटीव्ही वाढविण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली.
उद्यान विभागाचे उपायुक्त गणेश राठोड यांनी प्रसारित चित्रफितीची दखल घेत संबंधित अधिकाऱ्यांना सोमवारी प्रत्यक्ष पाहणी करण्याचे निर्देश दिले आहेत. पाहणीदरम्यान आक्षेपार्ह बाबी आढळल्यास संबंधितांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात येईल आणि नियमानुसार कारवाई केली जाईल, असे राठोड यांनी सांगितले.
महापालिकेकडे शहरातील २०४ सार्वजनिक उद्यानांची देखभाल असून सर्वच उद्यानांमध्ये सुरक्षारक्षक उपलब्ध नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. समाजकंटकांचा वावर आणि स्थानिक परिस्थिती लक्षात घेऊन संवेदनशील उद्यानांमध्ये टप्प्याटप्प्याने सुरक्षारक्षक नियुक्त करण्याबाबत धोरण तयार करण्यात येत असल्याचेही राठोड यांनी सांगितले. धंतोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक साईनाथ रामोद यांनी या प्रकरणी अद्याप कोणतीही अधिकृत तक्रार प्राप्त झालेली नसल्याचे सांगितले. मात्र, अधिकृत चौकशी सुरू होण्यापूर्वीच या घटनेमुळे सार्वजनिक उद्यानांच्या सुरक्षिततेबाबत नागरिकांमध्ये चिंता व्यक्त होत आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.