नागपुरात इथेनॉलविरोधात आंदोलन, गडकरी वाड्याकडे जाण्यापूर्वीच पोलिसांनी रोखलं; आंदोलनकर्ते ताब्यात
नागपूर : खरा पंचनामा
पेट्रोलमध्ये इथेनॉलमध्ये मिश्रणाविरोधात देशभरात विरोधक आणि समर्थक असे दोन गट पडले आहे. विरोधकांनी इथेनॉलमुळे वाहनात बिघाड होत असल्याचा दावा करण्यात येत आहे. त्यांनी आंदोलनाला सुरुवात केली असून नागपुरातही थेट केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्या महाल येथील घरापासून १५० मिटर अंतरावर आंदोलन करण्यात आले. त्यामुळे पोलिसांचीही तारांबळ उडाली.
नागपुरात इथेनॉलविरोधात प्रथमच आज मंगळवारी दुपारी आंदोलन करण्यात आले. दुपारी १२ वाजता आंदोलकांनी महाल येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ गर्दी केली. हे स्थळ केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्या वाड्यापासून १५० मिटर अंतरावर आहे. आंदोलनाची घोषणा काल सोमवारी करण्यात आल्याने येथे पोलिसांचा मोठा बंदोबस्त होता. आंदोलकांनी गडकरी यांच्या वाड्यापर्यंत रॅली काढण्याचा प्रयत्न केला. परंतु पोलिसांनी त्यांना रोखले. यावेळी केंद्र सरकार धोरणाचा निषेध व्यक्त करत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. हे आंदोलन आम आदमी पक्षाच्या वतीने करण्यात आले. आंदोलनात मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. आंदोलन गडकरी यांच्या विरोधात नसून इथेनॉल सक्तीविरोधात असल्याचे आम आदमी पक्षाचे प्रदेश संघटक भूषण ढाकुलकर यांनी यावेळी सांगितले.
आंदोलनकर्त्यांना रोखण्यासाठी पोलिसांची चांगलीच धावपळ झाली. महाल हा परिसर वर्दळीचा आहे. मोठी बाजारपेठ असल्याने नागरिकांचे ये जा सुरू असते. आंदोलनामुळे नागरिकांना रस्त्यातून मार्ग काढताना कसरत करावी लागली. नागरिकांना सुरक्षित मार्ग उपलब्ध करून देतानाच आंदोलकांनाही रोखण्याची दुहेरी कामगिरी करताना पोलिसांची तारांबळ उडाली. पोलिसांनी सर्व आंदोलकांना ताब्यातही घेतले.
पेट्रोलमध्ये २० टक्के इथेनॉल (E20) मिसळण्याच्या केंद्र सरकारच्या धोरणाविरोधात यापूर्वी दिल्लीत जोरदार आंदोलन करण्यात आले. २०२३ पूर्वीच्या गाड्यांमध्ये हे इंधन वापरल्याने मायलेज कमी होणे व इंजिन खराब होणे यासारख्या समस्या येत असल्याचा वाहनधारकांचा दावा आहे. याविरोधात जंतरमंतरवर आंदोलने करण्यात आली होती. ग्राहकांना इथेनॉल-मुक्त पेट्रोलचा पर्याय मिळावा अशी प्रमुख मागणी आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.