Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

मिरजेत एम.एस.ई.बी. ऑपरेटरची हत्यामहात्मा गांधी चौक पोलिसांकडून अवघ्या ५ तासांत २ संशयितांना अटक

मिरजेत एम.एस.ई.बी. ऑपरेटरची हत्या
महात्मा गांधी चौक पोलिसांकडून अवघ्या ५ तासांत २ संशयितांना अटक

पूजा फडके 
मिरज : खरा पंचनामा 

येथील कृपामाई एम.एस.ई.बी. (MSEB) सबस्टेशनमध्ये कार्यरत असलेले ऑपरेटर सुधीर पंडित लाटवडे (वय ४०, रा. शिंदेवाडी, ता. कवठेमहांकाळ) यांचा लोखंडी बारने डोक्यावर व चेहऱ्यावर वार करून निर्घृण खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना २९ जुलै २०२६ रोजी रात्री घडली. या प्रकरणी महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याच्या डी.बी. पथकाने अत्यंत सतर्कता दाखवत अवघ्या पाच तासांत दोन संशयित आरोपींना जेरबंद केले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कृपामाई एम.एस.ई.बी. सबस्टेशनमधील ऑपरेटर रूममध्ये सुधीर लाटवडे यांच्यावर  २९ जुलै २०२६ रोजी रात्री ८:१० ते ८:३५ वाजेच्या सुमारास अज्ञात इसमाने प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात लाटवडे यांचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी मेस्को सुरक्षा रक्षक रामकृष्ण गणपती तोडकर (वय ४२, रा. मिरज) यांनी महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १०३(१) अन्वये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.
अटक करण्यात आलेले संशयित आरोपी  सौरभ संतोष निकम (वय २३, रा. एम.एस.ई.बी. रोड, बेडग, ता. मिरज),  विनायक विक्रम सावंत (वय २२, रा. दुधगाव रोड, बागणी, ता. वाळवा) हे आहेत.

वादाचा राग आणि हत्येचे कारण
गुन्हा दाखल होताच सांगलीचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी मुकुंद कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे व त्यांच्या डी.बी. पथकाने तपासाची सूत्रे वेगाने हलवली.
तांत्रिक व गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी थरारक पाठलाग करून ३० जुलै रोजी पहाटे दोन्ही संशयितांना ताब्यात घेतले. संशयित सौरभ निकम याचे वडील संतोष निकम हे कृपामाई सबस्टेशन येथे सुरक्षा रक्षक म्हणून काम करतात. २९ जुलैच्या सायंकाळी मयत सुधीर लाटवडे आणि संतोष निकम यांच्यात किरकोळ कारणावरून वाद झाला होता. याच रागातून सौरभ निकम याने त्याचा साथीदार विनायक सावंत याच्यासह दुचाकीवरून सबस्टेशन गाठले आणि ऑपरेटर रूममध्ये लाटवडे यांच्या डोक्यात व चेहऱ्यावर लोखंडी बारने गंभीर वार करून त्यांची हत्या केल्याची कबुली दिली.

कोणतीही पूर्वकल्पना किंवा आरोपींची थेट माहिती उपलब्ध नसताना, तांत्रिक आणि गुप्त बातमीदारांच्या मदतीने गुन्ह्याची नोंद झाल्यानंतर अवघ्या ५ तासांच्या आत आरोपींना जेरबंद करून पोलिसांनी खुनाचा उलगडा केला.

ही कामगिरी स.पो.नि. संदीप शिंदे, पो.उ.नि. रुपाली गायकवाड, सुदर्शन वाघमोडे, अभिजीत धनगर, सचिन कुंभार, सर्जेराव पवार, इब्राहीम तांबोळी, संतोष डामसे, नानासाहेब चंदनशिवे, विनोद चव्हाण, जावेद शेख, मोसीन टिनमेकर, राजेंद्र हारगे, अमोल तोडकर, सुधीर खोंद्रे, पांडूरंग हिप्परकर आणि सायबर पोलीस ठाण्याचे कॅप्टन गुंडवाडे व विजय पाटणकर यांच्या पथकाने केली.

सदर गुन्ह्याचा पुढील तपास स.पो.नि. संदीप शिंदे करत आहेत. गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांचा बंदोबस्त करण्यासाठी नागरिकांनी अशा संशयितांची माहिती पोलिसांना द्यावी, असे आवाहन सांगली जिल्हा पोलिसांतर्फे करण्यात आले आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.