Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

'मुळा-मुठा'वरील २४ कोटींचा पूल पहिल्याच पुरात कोसळला; पीएमआरडीएच्या कामावर प्रश्नचिन्ह..

'मुळा-मुठा'वरील २४ कोटींचा पूल पहिल्याच पुरात कोसळला; पीएमआरडीएच्या कामावर प्रश्नचिन्ह..

उरुळी कांचन : खरा पंचनामा 

हवेली तालुक्यातील हिंगणगाव-खामगाव टेक येथील मुळा-मुठा नदीवरील तब्बल २४ कोटी रुपयांचा पूल पहिल्याच पुरात कोसळला. पीएमआरडीएच्या निकृष्ट कामाचा आणि भ्रष्टाचाराचा बुरखा फाटला असून, या घटनेने संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली आहे. प्रशासकीय यंत्रणा मात्र अद्याप ढिम्म आहे.

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) माध्यमातून उभारण्यात येत असलेल्या हिंगणगाव ते खामगाव टेक जोडणाऱ्या पुलाचे मोठे स्लॅब आणि पिलर पावसाळ्याच्या सुरुवातीलाच आलेल्या पुराच्या तडाख्यात जमीनदोस्त झाले आहेत. या निकृष्ट बांधकामाची पाहणी करून शिवसेनेचे युवा नेते व जिल्हा नियोजन समिती सदस्य अलंकार कांचन यांनी तीव्र संताप व्यक्त करत या प्रकरणाच्या तातडीने चौकशीची मागणी केली आहे.

"ठेकेदाराला बिल मंजूर करण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांना २० ते ३० टक्के 'कमिशन' द्यावे लागते. या टक्केवारीच्या खेळामुळेच ठेकेदार अत्यंत निकृष्ट दर्जाचे काम करतात," असा थेट आरोप अलंकार कांचन यांनी केला आहे. पुलाची अशी दुरवस्था होऊनही अद्याप एकही अधिकारी किंवा ठेकेदार घटनास्थळी फिरकला नसल्याने त्यांनी आश्चर्य व्यक्त केले. या प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उच्चस्तरीय चौकशी करून दोषी ठेकेदारावर आणि संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी त्यांनी केली आहे.

पहिल्याच पावसात पूल कोसळल्याने भविष्यात या पुलाच्या मजबुतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, प्रशासन आता या भ्रष्ट ठेकेदारावर कारवाई करणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, याबाबत पीएमआरडीएच्या संबंधित अधिकाऱ्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता होऊ शकला नाही.

एकीकडे लोकप्रतिनिधी जनतेसाठी निधी खेचून आणतात, तर दुसरीकडे भ्रष्ट अधिकारी आणि ठेकेदार टक्केवारीच्या खेळात जनतेचा पैसा पाण्यात घालवतात. या टक्केवारीच्या चक्रात महाराष्ट्राचा बिहार होतोय का, असा प्रश्न पडतो. यामुळे सरकार आणि नेत्यांची प्रतिमा मलीन होत आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.