Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

गुंडेवाडी ग्रामपंचायतीच्या महिला ग्रामविकास अधिकाऱ्यासह लिपिकावर गुन्हा९५ हजारांच्या लाचेची केली होती मागणी

गुंडेवाडी ग्रामपंचायतीच्या महिला ग्रामविकास अधिकाऱ्यासह लिपिकावर गुन्हा
९५ हजारांच्या लाचेची केली होती मागणी

पूजा फडके 
सांगली : खरा पंचनामा 

ग्रामपंचायत गुंडेवाडी (ता. मिरज, जि. सांगली) येथे पुरवलेल्या साहित्याचे प्रलंबित बिल मंजूर करण्यासाठी तब्बल ९५ हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी ग्रामविकास अधिकारी आणि लिपिकावर मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती सांगली एसीबीच्या पोलीस उपाधीक्षक यास्मिन इनामदार यांनी दिली.

लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (ACB) सांगली युनिटने दिलेल्या माहितीनुसार, श्रीमती वर्षा शंकर कदम (वय ४०, पद-ग्रामविकास अधिकारी, रा. खटाव) आणि शरद दत्तात्रय चौगुले (वय ४०, पद-क्लार्क, रा. सिध्देवाडी) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयित लोकसेवकांची नावे आहेत.

तक्रारदाराने गुंडेवाडी ग्रामपंचायतीला लागणारे आवश्यक साहित्य पुरवले होते. या पुरवलेल्या साहित्याचे बिल काढण्यासाठी आणि प्रलंबित बिलाच्या मोबदल्यात ग्रामविकास अधिकारी वर्षा कदम आणि क्लार्क शरद चौगुले यांनी तक्रारदाराकडे १ लाख २८ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती.
याबाबत तक्रारदाराने १७ जून २०२६ रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, सांगली येथे तक्रार दाखल केली. तक्रार प्राप्त झाल्यानंतर एसीबीच्या पथकाने १७ जून २०२६ रोजी पडताळणी कारवाई केली. या पडताळणीदरम्यान, आरोपींनी स्वतःच्या पदाचा गैरवापर करून तक्रारदाराकडे सुरुवातीला १ लाख २८ हजार रुपयांची मागणी केली. त्यानंतर तडजोडीअंती प्रथम २८ हजार आणि नंतर ५ हजार रुपये कमी करून, अखेर ९५ हजार रुपयांची लाच मागितल्याचे निष्पन्न झाले.

या प्रकरणी दोन्ही आरोपींविरोधात मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ च्या कलम ७ अन्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

सांगली एसीबीच्या पोलीस उपाधीक्षक यास्मीन इनामदार यांच्या मार्गदर्शनाने प्रितम चौगुले, विना जाधव, अजित पाटील, चंद्रकांत जाधव, पोपट पाटील, उमेश जाधव, सलीम मकानदार, ऋषिकेश बडणीकर, प्रकाश जाधव, सुदर्शन पाटील, मनोज निळकंठ, चालक विठ्ठलसिंग राजपूत यांच्या पथकाने ही कारवाई केली.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.