Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

सांगलीत 'एन. जी. ग्रुप' टोळीवर 'मोक्का'; निल्या गडदे, म्हमद्याचा समावेश वेदांत बंडगर खून प्रकरणातील संशयितांना आयजी रंजन शर्मा यांचा दणका

सांगलीत 'एन. जी. ग्रुप' टोळीवर 'मोक्का'; निल्या गडदे, म्हमद्याचा समावेश 
वेदांत बंडगर खून प्रकरणातील संशयितांना आयजी रंजन शर्मा यांचा दणका 

पूजा फडके 
सांगली : खरा पंचनामा 

सांगली शहरात घडलेल्या वेदांत मारुती बंडगर याच्या खून प्रकरणातील मुख्य सूत्रधारासह त्याच्या संघटित गुन्हेगारी टोळीवर (एन. जी. ग्रुप) महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम (मोक्का) अंतर्गत धडक कारवाई करण्यात आली आहे. कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक रंजन कुमार शर्मा यांनी या कारवाईला मंजुरी दिली असून, यामुळे सांगली जिल्ह्यातील गुन्हेगारी वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे. या कारवाईमुळे जिल्ह्यातील संघटित गुन्हेगारीचा कणा मोडण्यास पोलिसांना मोठे यश आले आहे.
९ आरोपींवर 'मोक्का' अंतर्गत कारवाई
संजयनगर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या खुनाच्या गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे (LCB) पोलीस निरीक्षक संजीव झाडे करत होते. तपासादरम्यान समोर आले की, टोळीप्रमुख निलेश विठोबा गडदे (रा. वाघमोडे नगर, कुपवाड) याने अन्य साथीदारांना सोबत घेऊन "एन. जी. ग्रुप" नावाची एक भयंकर संघटित गुन्हेगारी टोळी तयार केली होती.
या कारवाईत मोक्का लागलेल्या आरोपींची नावे खालीलप्रमाणे आहेत :
निलेश विठोबा गडदे (टोळी प्रमुख), किरण शंकर लोखंडे (वय २५, रा. कुपवाड), विशाल बिरुदेव चौगुले (रा. पिंपलवाडी, कवठेमहांकाळ),  नानासो उर्फ सागर माणिक चौगुले (रा. पिंपलवाडी, कवठेमहांकाळ), अतुल दादासो वायदंडे (वय २८, रा. खंडेराजुरी, मिरज), संदेश उर्फ सँन्डी रामचंद्र घागरे (वय २३, रा. कुपवाड/ढालगाव), एक विधीसंघर्षग्रस्त बालक (नाबालिक आरोपी),मलिक सलिम शेख (रा. दत्तनगर, कुपवाड), महमंद जमाल नदाफ (वय ४२, रा. अभयनगर, संजयनगर)

आंतरराज्यीय गुन्हेगारी आणि दहशतीचे साम्राज्य
पोलीस तपासात समोर आलेली माहिती धक्कादायक आहे. ही टोळी स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी आणि वर्चस्वासाठी २०१७ पासून ते २०२६ पर्यंत सातत्याने गंभीर गुन्हे करत आली आहे. टोळीचे कार्यक्षेत्र केवळ सांगली, मिरज, कुपवाड, जत, आणि कवठेमहांकाळपुरते मर्यादित नसून, शेजारील कर्नाटक राज्यातील बेळगाव (कागवाड) आणि बागलकोट (बनहट्टी) जिल्ह्यांपर्यंत पसरलेले आहे. या टोळीवर खून, खुनाचा प्रयत्न, प्राणघातक हल्ला, खंडणी गोळा करणे, बेकायदेशीर शस्त्रे बाळगणे आणि अंमली पदार्थांची शेती करणे यासारखे अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत.

गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांनी सरकारी अभियोक्ता श्रीमती ज्योती डाके यांच्याकडून कायदेशीर अभिप्राय घेतला. त्यानंतर मोक्का कलमे लावण्याचा प्रस्ताव सांगलीचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांच्याकडे सादर केला. पोलीस अधीक्षकांनी या प्रस्तावाचे बारीक निरीक्षण करून तो विशेष पोलीस महानिरीक्षक रंजन कुमार शर्मा यांच्याकडे मंजुरीसाठी पाठवला होता, ज्याला आता मंजुरी मिळाली आहे.

सदर प्रकरणाचा पुढील तपास सांगली शहर विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप भागवत यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. ही धडक कारवाई विशेष पोलीस महानिरीक्षक रंजन कुमार शर्मा, पोलीस अधीक्षक तुषार दोशी, आणि अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती कल्पना बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे, सहायक निरीक्षक प्रशांत निशाणदार, राजेंद्र यादव, उपनिरीक्षक कुमार पाटील, महादेव पोवार, बसवराज शिरगुप्पी, नागेश कांबळे, इम्रान मुल्ला आणि दिपक गट्टे यांच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.