पावसाच्या साचणाऱ्या पाण्यावर कायमस्वरूपी उपाययोजना करा
नगरसेवक अशोक मासाळे यांची मनपा आयुक्तांकडे पत्राद्वारे मागणी
सांगली : खरा पंचनामा
महाराष्ट्र राज्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे ठिकठिकाणी दुर्घटना घडत असून जीवितहानीच्या घटना समोर येत आहेत. या पार्श्वभूमीवर सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्रातही नागरिकांच्या जीवित व मालमत्तेच्या सुरक्षेसाठी तातडीने प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात, अशी आग्रही मागणी नगरसेवक अशोक चंद्राप्पा मासाळे यांनी मनपा आयुक्तांकडे एका पत्राद्वारे केली आहे. नगरसेवक मासाळे यांनी आयुक्तांना दिलेल्या पत्रात शहरातील अनेक गंभीर समस्यांकडे लक्ष वेधले आहे.
महानगरपालिका क्षेत्रातील विविध भागांमध्ये असलेले जीर्ण व उघडे मॅनहोल (ड्रेनेज चेंबर), धोकादायक इमारती, रस्त्यांच्या कडेला असलेली धोकादायक झाडे आणि रस्त्यांवरील मोठे खड्डे नागरिकांच्या जिवासाठी गंभीर धोका निर्माण करत आहेत. भविष्यातील कोणतीही मोठी दुर्घटना टाळण्यासाठी संबंधित विभागाने या सर्व बाबींचे तात्काळ सर्वेक्षण करून आवश्यक त्या दुरुस्त्या व संरक्षणात्मक उपाययोजना युद्धपातळीवर कराव्यात, असे त्यांनी पत्रात नमूद केले आहे.
विशेषतः सांगली प्रभाग क्रमांक १० मधील भीमनगर, गोकुळनगर, इंद्रप्रस्थ नगर, मिरा हाउसिंग सोसायटी व गायत्री नगर या परिसराचा उल्लेख करत त्यांनी येथील नागरिकांच्या व्यथा मांडल्या. या परिसरात प्रत्येक पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी साचते. नागरिकांच्या घरांमध्ये पाणी शिरल्यामुळे संसारोपयोगी साहित्याचे प्रचंड नुकसान होऊन त्यांना मोठा आर्थिक फटका बसतो. तसेच दैनंदिन जीवन जगताना रहिवाशांना अतोनात अडचणींचा सामना करावा लागतो. या साचून राहणाऱ्या पाण्याच्या निचऱ्यासाठी प्रभावी व्यवस्था निर्माण करणे आवश्यक आहे. संबंधित परिसरामध्ये नवीन पावसाळी गटारे, नाले व सक्षम जलनिस्सारण व्यवस्था विकसित करण्यात यावी, जेणेकरून नागरिकांना या समस्येपासून कायमची मुक्ती मिळेल. या संदर्भात मनपा प्रशासनाने संबंधित विभागांना आवश्यक त्या सूचना देऊन तातडीने कार्यवाही करावी, अशी नम्र विनंती नगरसेवक अशोक मासाळे यांनी प्रशासनाकडे केली आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.