Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

दोन सख्या भावांना जन्मठेप आणि दंडाची शिक्षाजत येथील सागर डांगे खून प्रकरण

दोन सख्या भावांना जन्मठेप आणि दंडाची शिक्षा
जत येथील सागर डांगे खून प्रकरण

पूजा फडके 
जत : खरा पंचनामा 

जत तालुक्यातील डफळापूर (कोळेशिवार) येथील सागर बाळासो डांगे याच्या निर्घृण खून प्रकरणात सांगली येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. आरोपी ज्ञानेश्वर पंडित डांगे (वय २१) आणि संतोष पंडित डांगे (वय २३) या दोघांना भादंवि कलम ३०२ व ३४ अन्वये दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा आणि प्रत्येकी ५,००० रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. दंड न भरल्यास आरोपींना अतिरिक्त एक वर्षाचा कारावास भोगे लागतील, असा आदेश न्यायालयाने दिला आहे. सदर खटल्याची सुनावणी अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश क्र. ३ एस. आर. पडवळ यांच्यासमोर झाली.

जमिनीच्या वादातून झाली होती हत्या
मिळालेल्या माहितीनुसार, मयत सागर डांगे आणि आरोपी यांच्यात शेतजमिनीवरून वाद सुरू होता. २६ जुलै २०१९ रोजी सकाळी १० वाजता आरोपींनी वादाच्या जमिनीत ट्रॅक्टर चालवण्याचा प्रयत्न केला असता मयताशी त्यांचा वाद झाला. त्यानंतर दुपारी २ वाजेच्या सुमारास आरोपी पुन्हा ट्रॅक्टर घेऊन उभ्या बाजरीच्या पिकात नांगरणीसाठी आले.
त्यावेळी मयत सागर डांगे व त्याच्या कुटुंबीयांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. या वादाचे रूपांतर हिंसक मारामारीत झाले. आरोपी ज्ञानेश्वर डांगे याने सागरच्या डोक्यात कुऱ्हाडीचा वार केला, तर संतोष डांगे याने लोखंडी पाईपने गंभीर मारहाण केली. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या सागरचा जागीच मृत्यू झाला होता.

१२ साक्षीदारांची साक्ष ठरली महत्त्वाची
या खटल्यात सरकारी पक्षातर्फे एकूण १२ साक्षीदार तपासण्यात आले. यामध्ये मयताचा भाऊ (फिर्यादी), आई आणि पत्नी यांच्या प्रत्यक्षदर्शी साक्षी पुराव्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या ठरल्या. जत पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक आर. एस. गुंडरे यांनी या गुन्ह्याचा तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र (चार्जशीट) दाखल केले होते.
सरकारी पक्षातर्फे अतिरिक्त जिल्हा सरकारी वकील शैलेंद्र राजाराम हिंगमिरे यांनी प्रभावी युक्तिवाद करून आरोपींवरील गुन्हे सिद्ध केले. 

या प्रकरणात जत पोलीस ठाण्याचे पैरवी पोलीस तुकाराम बंडगर, कोर्ट पैरवी वंदना मिसाळ, कोर्ट ऑर्डरली सतीश माळी आणि श्रेणी पोलीस उपनिरीक्षक एस. डी. कापूरकर यांचे विशेष सहकार्य लाभले.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.