Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

सांगलीत घरफोडी अन् बाइक चोरी उघडकीसरेकॉर्डवरील गुन्हेगारासह २ बालअपचारी ताब्यात, ३.५ लाखांचा मुद्देमाल जप्त

सांगलीत घरफोडी अन् बाइक चोरी उघडकीस
रेकॉर्डवरील गुन्हेगारासह २ बालअपचारी ताब्यात, ३.५ लाखांचा मुद्देमाल जप्त

पूजा फडके 
सांगली : खरा पंचनामा 

सांगलीच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने (LCB) कारवाई करत घरफोडी आणि मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्यांची उकल केली आहे. या कारवाईत रेकॉर्डवरील १ सराईत गुन्हेगार आणि २ बालअपचाऱ्यांना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांच्याकडून एकूण ३ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
मेघनाथ ऊर्फ मेघ्या हिरालाल सोनभाईर (वय १९, रा. अमराई, बालाजी रोड, सांगली) असे अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे.

पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी मालमत्तेविरुद्धच्या गुन्ह्यांवर कारवाई करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांच्या मार्गदर्शनाखाली एक पथक तैनात करण्यात आले होते.

२५ जुलै रोजी पोलीस अमंलदार संकेत कानडे, आणि अभिजीत माळकर यांना बातमीदाराकडून गुप्त माहिती मिळाली की, रेकॉर्डवरील गुन्हेगार मेघनाथ सोनभाईर हा त्याच्या दोन साथीदारांसह चोरीचे दागिने विकण्यासाठी संजयनगर येथील मंगळवार बाजारात महापालिकेच्या गाळ्यांसमोर आला आहे. मिळालेल्या बातमीच्या आधारे पथकाने मंगळवार बाजार परिसरात सापळा रचून तिघांना ताब्यात घेतले. त्यांची पंचांसमक्ष अंगझडती घेतली असता त्यांच्याकडे सोन्या-चांदीचे दागिने मिळून आले. पोलीस चौकशीत त्यांनी अभयनगर येथील बंद घरात घरफोडी केल्याची आणि इचलकरंजी येथून एक मोटारसायकल चोरी केल्याची कबुली दिली.

पोलीस पथकाने तिघांकडून खालील मुद्देमाल जप्त केला आहे सोन्याचे दागिने: ₹२,८०,००० किमतीचे (२० ग्रॅम वजन - पेन्डन, टॉप्स, मणी इ.), चांदीचे दागिने: ₹३०,००० किमतीचे (५० ग्रॅम वजन - छल्ला, पैंजण इ., मोटार सायकल: ₹४०,००० किमतीची काळ्या रंगाची हिरो होंडा स्प्लेण्डर, एकूण जप्त रक्कमेचे मूल्य: ₹३,५०,०००/- इतके आहे.

या कारवाईमुळे संजयनगर पोलीस ठाणे (घरफोडी - अभयनगर) आणि इचलकरंजी पोलीस ठाणे, जि. कोल्हापूर (मोटारसायकल चोरी) येथील गुन्हे उघडकीस आले आहेत. संशयित आरोपी मेघनाथ सोनभाईर हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वीही मालमत्ता व शरीराविरुद्धचे गुन्हे दाखल आहेत.

ही कारवाई पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजीव झाडे, संदीप पाटील, अतुल माने, रणजीत जाधव, प्रकाश पाटील, संकेत कानडे, अभिजीत माळकर, ऋषिकेश सदामते, विनायक सनदी, विक्रम खोत तसेच सायबर पोलीस ठाण्याचे विजय पाटणकर, अजय पाटील, करण परदेशी, इम्रान महालकरी आणि कॅप्टन गुंडवाडे यांच्या पथकाने केली. पुढील तपासासाठी आरोपींना जप्त मुद्देमालासह संजयनगर पोलीस ठाण्याच्या स्वाधीन करण्यात आले आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.