Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

लहान मुलीचा विनयभंग करणाऱ्या आरोपीला ४ वर्षांची सक्तमजुरी, १० हजारांचा दंड

लहान मुलीचा विनयभंग करणाऱ्या आरोपीला ४ वर्षांची सक्तमजुरी, १० हजारांचा दंड

पूजा फडके 
सांगली : खरा पंचनामा 

एका लहान मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी सांगली येथील जिल्हा व अति. सत्र न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवून एकूण ०४ वर्षे कारावास आणि १०,००० रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. दंड न भरल्यास अतिरिक्त १५ दिवस साधी कैद भोगावी लागेल, असा आदेश न्यायालयाने दिला आहे.

हा खटला सांगली येथील जिल्हा व अति. सत्र न्यायाधीश श्रीमती जे. ए. मोहंती यांच्यासमोर चालला. न्यायालयाच्या आदेशानुसार, आरोपी दत्तात्रय भानुदास वनखंडे (वय- ३२, रा. कसनेवाडा, जत, ता. जत, जि. सांगली) याला भा.दं.वि.सं. कलम ३५४ आणि बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा (पोक्सो) कलम ७ आणि ८ अन्वये दोषी धरण्यात आले आहे. 

ही घटना जत पोलीस ठाण्याच्या हद्दीत २५ मार्च २०१६ रोजी सायंकाळी ५ वाजता घडली होती. पीडित लहान मुलगी (वय सुमारे ५ ते ६ वर्षे) आपल्या काकीकडे खेळायला जात असताना, आरोपी त्याच्या रिक्षामध्ये बसला होता. आरोपीने पीडितेला रिक्षात बोलावून घेऊन तिच्याशी गैरवर्तन केले. त्यावेळी पीडितेने "मला सोड, मला सोड" म्हणून आरडाओरडा केला. मुलीचा आवाज ऐकून तिची काकी धावून आली आणि तिने पीडितेला आरोपीच्या तावडीतून सोडवले. यानंतर पीडितेच्या आईने जत पोलीस ठाण्यात भा.दं.वि. कलम ३५४ व पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल केला होता.

तपास अधिकारी मनोज सोनवलकर यांनी या प्रकरणाचा तपास करून घटनास्थळावरून रिक्षा जप्त केली आणि कोर्टात दोषारोपपत्र दाखल केले. खटल्यादरम्यान सरकार पक्षातर्फे एकूण सहा साक्षीदार तपासण्यात आले. सरकार पक्षातर्फे अति. जिल्हा सरकारी वकील अॅड. आरती आनंद देशपांडे (सातविलकर) यांनी प्रभावीपणे काम पाहिले. आरोपीच्या वतीने बचावाचा प्रयत्न करण्यात आला, मात्र न्यायालयाने पीडितेची आणि तिच्या कुटुंबीयांची साक्ष ग्राह्य धरून आरोपीला दोषी ठरवले.

या संपूर्ण कारवाईत जत पोलीस ठाण्याचे पोलीस सचिन बंडगर, सांगली पैरवी कक्षातील महिला पोलीस रेखा खोत आणि सुनिता आवळे यांचे सहकार्य लाभले.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.