मणेराजुरी येथील सराफ दुकानातील चोरीचा छडा
२ किलोहून अधिक चांदीच्या दागिन्यांसह चोरटा जेरबंद
पूजा फडके
सांगली : खरा पंचनामा
मणेराजुरी (ता. तासगाव) येथील एका सोन्या-चांदीच्या दुकानात चोरी करणाऱ्या सराईत चोराला अटक करण्यात सांगली पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला (LCB) मोठे यश आले आहे. पोलिसांनी आरोपीकडून २ किलो ७३४ ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने आणि गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल असा एकूण सहा लाख ९२ हजार ०८० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ९ जुलै २०२६ रोजी मणेराजुरी गावातील 'महालक्ष्मी ज्वेलर्स' या दुकानाचा कडी-कोयंडा तोडून अज्ञात चोरट्यांनी चांदीचे दागिने चोरून नेले होते. या प्रकरणी राहुल विलास कदम (रा. कुमठे, ता. तासगाव) यांनी तासगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.
सांगलीचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी आणि अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हेगारांचा शोध घेण्यासाठी एक विशेष पथक तयार करण्यात आले होते. पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांच्या नेतृत्वाखालील पथकातील पोलीस कर्मचारी सागर टिंगरे यांना खास बातमीदारामार्फत एक महत्त्वाची माहिती मिळाली. बातमीनुसार, एक इसम यशवंतनगर ते वसंतदादा कारखान्याकडे जाणाऱ्या डांबरी रस्त्यावरील मदनभाऊ पाटील बालउद्यान परिसरात पाठीवर सॅक अडकवून चोरीचे दागिने विकण्यासाठी येणार होता. मिळालेल्या माहितीच्या आधारे पथकाने तिथे सापळा रचून संशयास्पदरीत्या थांबलेल्या इसमाला ताब्यात घेतले.
आरोपीची कबुली आणि जप्त मुद्देमाल
पकडण्यात आलेल्या आरोपीचे नाव राहुल दादासो जमदाडे (वय २९ वर्षे, रा. रामलिंग शाळेच्या जवळ, मणेराजुरी, ता. तासगाव, जि. सांगली) असे आहे.
सुरवातीला त्याने पोलिसांना उडवाउडवीची उत्तरे दिली, परंतु सखोल चौकशी अंती त्याने चार दिवसांपूर्वी महालक्ष्मी ज्वेलर्सचे कुलूप पक्कडच्या सहाय्याने तोडून चोरी केल्याची कबुली दिली.
पोलिसांनी जप्त केलेला मुद्देमाल ६,३२,०३० रुपये किमतीचे चांदीचे दागिने, (२,७३४ ग्रॅम वजनाचे पैंजण, करदोडा, ब्रेसलेट, छल्ला, गणपतीची मूर्ती, अंगठ्या, जोडवी, बांगड्या इत्यादी), ६०,००० रुपये किमतीची मोटरसायकल: (हिरो कंपनीची एचएफ डिलक्स, लाल-काळ्या रंगाची), ५० रुपये किमतीची पक्कड (गुन्ह्यात वापरलेले हत्यार) असा आहे.
पुढील तपासासाठी आरोपी आणि जप्त केलेला मुद्देमाल तासगाव पोलीस ठाण्याकडे सुपूर्द करण्यात आला आहे. ही कामगिरी पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांच्या मार्गदर्शनाने सागर टिंगरे, अतुल माने, सागर लवटे, संदीप गुरव, संदीप नलावडे, अमर नरळे, सुनिल जाधव, विक्रम खोत, महेश कुंभार, गणेश शिंदे, सुशांत चिले. सायबर पोलीस ठाण्याचे विजय पाटणकर, कॅप्टन गुंडवाडे यांच्या पथकाने केली.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.