Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

डॉक्टर-इंजिनिअर बनविण्याची फॅक्टरी' सरकारच्या रडारवरदिशाभूल करणाऱ्या जाहिराती क्लासेसना महागात पडणार

डॉक्टर-इंजिनिअर बनविण्याची फॅक्टरी' सरकारच्या रडारवर
दिशाभूल करणाऱ्या जाहिराती क्लासेसना महागात पडणार 

मुंबई : खरा पंचनामा 

'डॉक्टर-इंजिनिअर बनविण्याची फॅक्टरी'सारखे अतिशयोक्तीपूर्ण दावे करणाऱ्या महाराष्ट्रातील सर्व कोचिंग क्लासेसच्या जाहिराती आता राज्य सरकारच्या रडारवर असतील. अशा जाहिरातीतून विद्यार्थी-पालकांची दिशाभूल करण्यात येत असल्याचे आढळून आल्यास, त्यांच्यावर अस्तित्त्वात असलेल्या कायद्याच्या आधारे कारवाई करण्याचे संकेत शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी विधान परिषदेत दिले.

तसेच खासगी कोचिंग क्लासेसवर नियंत्रण आणणाऱ्या कायद्याचे प्रारूप तयार असून येत्या हिवाळी अधिवेशनानंतर ते मान्यतेकरिता सभागृहात आणण्यात येईल, असेही भुसे यांनी स्पष्ट केले.

आमदार मनिषा कायंदे यांनी लक्षवेधीच्या माध्यमातून कोचिंग क्लासेसच्या दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींवर निर्बंध आणण्याची मागणी केली. नीट पेपरफुटी प्रकरणी सध्या मोटेगावकर क्लासेसचे संचालक अटकेत आहेत. या क्लासकडून 'डॉक्टर-इंजिनिअर बनविण्याची फॅक्टरी', अशी जाहिरात केली जात असे. आता या प्रकारचा दावा संदीप अकॅडमीसारख्या एका क्लासकडून सातत्याने जाहिरातीच्या माध्यमातून केला जात आहे, याकडे कायंदे यांनी लक्ष वेधले. त्यावेळी संदीप अकॅडमीबरोबरच सर्वच क्लासेसच्या जाहिराती तपासून त्यांच्याकडून दिशाभूल केली जात असल्यास कारवाईचे संकेत भुसे यांनी दिले. तसेच खासगी कोचिंग क्लासेसच्या नियमनाकरिता कायदा आणण्यात येणार आहे. त्याकरिता केंद्राने आणि इतर राज्यांनी केलेल्या कायद्यांचा अभ्यास सुरू असल्याची माहिती भुसे यांनी दिली. 

या कायद्यात भौतिक सुविधा, शुल्क, विद्यार्थी संख्या, अभ्यासाच्या वेळा, जाहिराती, शिक्षकांची पात्रता यांबाबत स्पष्ट नियमावली असेल. न्याय व विधी विभागाच्या मान्यतेनंतर शिक्षक, पालक, अध्यापकांच्या आणि तज्ज्ञांच्या सूचना या प्रारूपावर मागविल्या जातील. त्यानंतर त्याला अंतिम स्वरूप देऊन ते सभागृहात मान्यतेकरिता आणू, अशी माहिती दिली. अनेक खासगी क्लासेसनी सोयीसाठी केवळ अकरावी-बारावीच्या वर्गांना परवानगी घेतली आहे. अशा क्लासेसवर कारवाई केली जाईल, असे इंटिग्रेटेड क्लासेसवर विचारण्यात आलेल्या प्रश्नाला उत्तर देताना भुसे यांनी सांगितले.

देशभरात जवळपास १३ हजार विद्यार्थ्यांनी परीक्षेच्या ताणतणावांमुळे आत्महत्या केल्याची माहिती आहे. त्यात १,५०० ते १,८०० विद्यार्थी राज्यातील आहेत. बिहार, दिल्लीने असे कायदे करून आघाडी घेतली. आपल्याकडे हा कायदा कधी येणार, असा प्रश्न चित्रा वाघ यांनी उपस्थित केला. तसेच, क्लासेसवर वचक ठेवण्याकरिता महाविद्यालयांमध्ये बायोमेट्रिक हजेरी बंधनकारक करण्याची आणि उपसंचालक कार्यालयांकडून भरारी पथके पाठवून विद्यार्थ्यांच्या हजेरीची तपासणी करण्याची मागणी वाघ यांनी केली. त्यावर अकरावी-बारावीकरिता सीसीटीव्ही, बायोमेट्रिक हजेरी बंधनकारक करण्यात आली आहे. तसेच, येत्या काळात भरारी पथके नेमली जातील, अशी माहिती भुसे यांनी दिली.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.