सांगलीत वर्चस्ववादातून कोयत्याने सपासप वार करत तरुणाचा निर्घृण खून
लखन इसरडे टोळीच्या कृत्याची शक्यता : कारण अस्पष्ट
सांगली : खरा पंचनामा
सांगलीतील कृष्णा नदी काठावरील श्री स्वामी समर्थ घाटाजवळ वर्चस्ववाद आणि पूर्व वैमनस्य यातून एका तरुणाचा कोयत्यासारख्या धारदार शस्त्रानी सपासप वार करत निर्घृणपणे खून करण्यात आला. मंगळवारी सायंकाळी साडेसहा ते सातच्या दरम्यान ही घटना घडली. गुंड लखन इसरडे याच्यासह त्याच्या तीन ते चार साथीदारांनी हा खून केल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. याबाबत रात्री उशिरापर्यंत शहर पोलीस ठाण्यात नोंद करण्याचे काम सुरु होते.
चेतन तोरणे ( वय 19, रा. टिम्बर एरिया वसाहत, सांगली) असे मृत तरुणाचे नाव आहे. संशयित इसरडे आणि मृत चेतन तोरणे एकेकाळी मित्र होते. त्यांच्यात किरकोळ वाद झाल्यानंतर तोरणे त्याची टोळी बनवत होता. त्यावेळपासून त्यांच्यात वर्चस्ववादातून सतत वाद होत होते.
मंगळवारी सायंकाळी चेतन श्री स्वामी समर्थ घाट परिसरात बसला होता. त्यावेळी संशयित तीन ते चारजण तेथे आले. ते आपला गेम करण्यासाठी आल्याचे लक्षात आल्यावर चेतनने नदीच्या काठाने पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र संशयितानी त्याचा पाठलाग करत त्याच्यावर कोयत्यासारख्या धारदार शस्त्रानी वार केले. त्यातील एक घाव चेतनच्या डोक्यात वर्मी घाव बसल्याने तो तेथेच कोसळला. तो रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे पाहून हल्लेखोर तेथून निघून गेले.
खुनाची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अपर अधीक्षक कल्पना बारवकर, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप भागवत, एलसीबीचे निरीक्षक संजीव झाडे, शहरचे निरीक्षक अरुण सुगावकर पथकासह घटनास्थळी पोहोचले. पंचनामा केल्यावर मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सिव्हिल हॉस्पिटल येथे पाठवण्यात आला.
या खुनाचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. इसरडे याचा यात सहभाग आहे का हेही अस्पष्ट आहे. काही हल्लेखोरांची नावे निष्पन्न झाली असून त्यांच्या शोधासाठी विविध ठिकाणी पथके पाठवण्यात आल्याचे एलसीबीचे निरीक्षक संजीव झाडे यांनी सांगितले.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.