तपासाच्या नावाखाली चक्क कास पठारावर पर्यटन; महिला अधिकाऱ्यांसह तिघांवर कारवाई
पुणे : खरा पंचनामा
तपासाच्या नावाखाली पर्यटन करणाऱ्या पुणे शहर पोलिस दलातील एका महिला पोलीस उपनिरीक्षकसह तीन कर्मचाऱ्यांवर प्रशासकीय कारवाई करण्यात आली आहे. विश्रामबाग पोलीस ठाण्यातील महिला पोलीस उपनिरीक्षक, पोलीस हवालदार आणि पोलीस शिपाई यांच्या दोन वर्षांच्या वार्षिक वेतनवाढी अप्पर पोलीस आयुक्त राजेश बनसोडे यांनी रोखल्या आहेत.
ही घटना ४ एप्रिल रोजीची आहे. विश्रामबाग पोलीस ठाण्यात दाखल एका गुन्ह्याच्या तपासासाठी हे तिघे आणि फिर्यादी यांना सोबत घेऊन सातारा येथे गेले होते. मात्र विभागीय चौकशीत असे समोर आले की, त्यांनी केवळ मोघम स्वरूपाचा तपास करून उर्वरित वेळ पर्यटनासाठी खर्च केला.
साताऱ्यात पोहोचल्यानंतर स्थानिक पोलिसांना तपासाबाबत माहिती देणे अपेक्षित होते. त्याऐवजी त्यांनी प्रथम प्रसिद्ध कणसे ढाब्यावर भोजन केले. दुपारी साडेतीन वाजता शाहूपुरी पोलीस ठाण्यात हजेरी लावून घटनास्थळी पंचनामा केला. पण घटनास्थळावरील व्यक्तींकडे किंवा परिसरातील नागरिकांकडे कोणतीही चौकशी केली नाही.
पंचनामा आणि अहवाल दिल्यानंतर पुण्याकडे परतणे अपेक्षित होते. मात्र संबंधित अधिकाऱ्यांनी थेट कास पठार गाठले आणि इतर प्रेक्षणीय स्थळांनाही भेटी दिल्या. सोबत असलेल्या फिर्यादीने घरी आई आजारी असल्याने लवकर परतण्याची विनंती केली होती. तिच्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. पर्यटन संपल्यानंतर रात्री ११ वाजता पुण्यात पोहोचल्यावर महिला फिर्यादीला सुरक्षितपणे घरी पोहोचवण्याऐवजी स्वारगेट बसस्थानकावर सोडण्याचा प्रयत्न झाला. विनंतीवरून शनिवार पेठ पोलीस चौकीजवळ सोडण्यात आले. यामुळे कर्तव्यात कसूर झाल्याचे चौकशीत नमूद आहे.
विभागीय चौकशी अहवालानुसार या तिघांनी कर्तव्यात बेशिस्तपणा, निष्काळजीपणा आणि हलगर्जीपणा केला. परिणामी पोलीस दलाची प्रतिमा जनमानसात मलिन झाली. त्यामुळे दोन वर्षांसाठी वार्षिक वेतनवाढ रोखण्याची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.