टिळक परिवार काँग्रेसपासून दुरावला !
मोदी, गडकरींनंतर डोभालांची एन्ट्री; पुरस्काराच्या मंचावर महायुतीच्या बड्या नेत्यांची मांदियाळी
पुणे : खरा पंचनामा
देशाचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांना यंदाचा प्रतिष्ठित 'लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार' जाहीर करण्यात आला आहे. येत्या १ ऑगस्ट रोजी लोकमान्य टिळक यांच्या 106 व्या पुण्यतिथीनिमित्त पुण्यातील मुकुंदनगर येथील कटारिया हायस्कूलच्या मैदानावर दुपारी 12 वाजता हा सोहळा पार पडणार आहे.
या सोहळ्याचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते अजित डोभाल यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. याशिवाय कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे आणि इतर मान्यवर प्रमुख उपस्थित राहणार असल्याची माहिती 'टिळक स्मारक ट्रस्ट'चे अध्यक्ष डॉ. रोहित टिळक यांनी पत्रकार परिषदेत दिली.
देशाच्या सुरक्षा व्यवस्थेत 'शत्रू राष्ट्राचा कर्दनकाळ' अशी ओळख असलेल्या अजित डोभाल यांनी 'ऑपरेशन सिंदूर', 'ऑपरेशन हॉट परसूट', 'बालाकोट एअर स्ट्राइक' आणि 'डोकलाम वाद' यांसारख्या अत्यंत संवेदनशील प्रसंगी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. गुप्तचर विभागात ३३ वर्षांहून अधिक काळ बजावलेली सेवा, 'ऑपरेशन ब्लॅक थंडर-२' मधील शौर्य, आणि 'कीर्ती चक्र' प्राप्त करणारे पहिले पोलीस अधिकारी असा त्यांचा दैदीप्यमान इतिहास आहे. देशाच्या सुरक्षेतील या अचाटयोगदानाबद्दल १ लाख रुपये आणि स्मृतिचिन्ह असे स्वरूप असलेल्या या पुरस्काराने त्यांना गौरविले जाणार आहे.
गेल्या काही वर्षांपासून लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराच्या मंचावरून सुरू असलेली राजकीय समीकरणे यंदाही चर्चेचा विषय ठरत आहेत. २०२४ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना हा पुरस्कार देण्यात आला होता. गेल्या वर्षी भाजपचे वरिष्ठ नेते व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. यंदा २०२६ ला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांना हा पुरस्कार दिला जात आहे.
पूर्वी काँग्रेस विचारसरणीशी व पक्षाशी निगडित असलेल्या टिळक कुटुंबाच्या विश्वस्त संस्थेकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुरस्कार दिल्यानंतर काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. या घडामोडींनंतर टिळक स्मारक ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. रोहित टिळक हे काँग्रेसपासून उत्तरोत्तर दुरावल्याचे पाहायला मिळाले.
गेल्या दोन-अडीच वर्षांपासून रोहित टिळक काँग्रेसच्या सक्रिय राजकारणापासून पूर्णपणे दूर आहेत. नुकत्याच पार पडलेल्या राज्यसभा आणि विधान परिषद निवडणुकांच्या काळात रोहित टिळक यांचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश होणार किंवा ते शिंदे यांच्या शिवसेनेचे उमेदवार असतील, अशा चर्चा राजकीय वर्तुळात जोरात रंगल्या होत्या.
जरी त्यांचा शिवसेनेतील अधिकृत प्रवेश तांत्रिकदृष्ट्या प्रलंबित असला, तरी काँग्रेसशी असलेला दुरावा मात्र कायम आहे. त्यामुळे एकेकाळी काँग्रेसच्या बड्या नेत्यांचा राबता असणाऱ्या टिळक पुरस्कार सोहळ्यात आता भाजप आणि महायुतीच्या बड्या नेत्यांची सातत्याने लागणारी उपस्थिती ही चर्चेच्या केंद्रस्थानी आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.