खांद्यावर तीन स्टारची जबाबदारी अन् पाच लाखांची लालसा!
पुणे : खरा पंचनामा
कायद्याचे रक्षण करण्याची जबाबदारी असलेल्या एका पोलीस अधिकाऱ्यावरच लाच मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जमिनीशी संबंधित तक्रार अर्ज निकाली काढण्यासाठी तब्बल १० लाख रुपयांची लाच मागून तडजोडीनंतर ५ लाख रुपये स्वीकारण्याची तयारी दर्शविल्याचा आरोप चाकण येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक तानाजी शिवाजी कदम यांच्यावर करण्यात आला आहे.
पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) ही कारवाई केली असून, या प्रकारामुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे.
पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणातील तक्रारदार हे पुणे परिसरात जमीन खरेदी-विक्रीचा व्यवसाय करतात. तक्रारदार आणि त्यांच्या मुलाविरोधात चाकण उत्तर पोलीस ठाण्यात दोन स्वतंत्र तक्रार अर्ज दाखल झाले होते. या अर्जाची चौकशी करण्याची जबाबदारी सहाय्यक पोलीस निरीक्षक तानाजी कदम यांच्याकडे सोपवण्यात आली होती.
चौकशीच्या अधिकाराचा गैरफायदा घेत कदम यांनी तक्रारदाराला धमकावल्याचा आरोप आहे. तसेच, संबंधित अर्ज वरिष्ठांना सांगून हे प्रकरण दिवाणी स्वरूपाचे असल्याचे भासवून निकाली काढतो, असे सांगत त्यांनी थेट १० लाख रुपयांची लाच मागितली. मात्र, तक्रारदाराला लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी पुणे एसीबी कार्यालयात जाऊन याबाबत रीतसर तक्रार दाखल केली.
तक्रारीनंतर एसीबीच्या पथकाने या प्रकरणाची पडताळणी केली. त्यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक तानाजी कदम यांनी तडजोडीनंतर ५ लाख रुपये लाच मागितल्याचे आणि ती रक्कम स्वीकारण्यास संमती दर्शविल्याचे तपासात निष्पन्न झाले.
एसीबीच्या तपासानुसार, ठरलेल्या व्यवहाराप्रमाणे लाचेचा पहिला हप्ता म्हणून अडीच लाख रुपये तातडीने देण्याचे निश्चित करण्यात आले होते. तर उर्वरित अडीच लाख रुपये काम पूर्ण झाल्यानंतर देण्याचे ठरले होते. लाच मागितल्याचे स्पष्ट झाल्यानंतर तानाजी कदम यांच्याविरोधात निगडी पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.