Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

स्वतःच्याच घरात मित्राच्या मदतीने डल्ला मारणारा मुख्य आरोपी मित्रासह जेरबंद७.३९ लाखांचा मुद्देमाल जप्त : सांगली एलसीबीची कारवाई

स्वतःच्याच घरात मित्राच्या मदतीने डल्ला मारणारा मुख्य आरोपी मित्रासह जेरबंद
७.३९ लाखांचा मुद्देमाल जप्त : सांगली एलसीबीची कारवाई 

पूजा फडके 
सांगली : खरा पंचनामा 

घरचे लोक कामासाठी बाहेर गेल्याची संधी साधून स्वतःच्याच घरात मित्राच्या मदतीने घरफोडी करणाऱ्या मुख्य आरोपीला त्याच्या साथीदारासह अटक करण्यात सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला (LCB) यश आले आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून ३९ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने आणि महागडे मोबाईल असा एकूण ७ लाख ३९ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

Pयाप्रकरणी दिपेश बाळासो पाटील (वय २५, रा. दर्गा परिसर, बिसूर, ता. मिरज) आणि महेशकुमार खंडेराव पाटील (वय ३९, रा. ग्रामपंचायत जवळ, बिसूर, ता. मिरज) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. यातील फिर्यादी दीपश्री बाळासो पाटील (रा. बिसूर) यांनी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात घरफोडीची तक्रार दाखल केली होती.

 बिसूर गावातील फिर्यादी दिनांक ११ जुलै २०२६ रोजी दुपारी कामानिमित्त बाहेर गेल्या होत्या. यावेळी अज्ञात चोरट्याने घराच्या दरवाजाची कडी उघडून बेडमधील सोन्याचे दागिने चोरून नेले होते. या गुन्ह्याचा समांतर तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पथक करत होते.

तपास सुरू असताना पथकाला खास बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, रेकॉर्डवरील आरोपी दिपेश पाटील व महेशकुमार पाटील हे चोरीचे दागिने विक्री करण्यासाठी कॉलेज कॉर्नर जवळील 'अक्षरम हॉटेल' परिसरात येणार आहेत. माहिती मिळताच पोलीस पथकाने या भागात सापळा रचला. संशयास्पद रित्या थांबलेल्या दोन्ही आरोपींना पळून जाण्याची संधी न देता जागीच ताब्यात घेतले.

सहायक पोलीस उपनिरीक्षक सुभाष सूर्यवंशी यांनी पंचांसमक्ष आरोपींची अंगझडती घेतली असता, दिपेश पाटील याच्या पँटच्या खिशात सोन्याची चैन व अंगठ्या मिळून आल्या. दागिन्यांबाबत अधिक चौकशी केली असता, दिपेशने धक्कादायक खुलासा केला. दोन दिवसांपूर्वी घरातील सर्वजण बाहेर गेले असताना, त्याने स्वतःचा मित्र महेशकुमार पाटील याच्या मदतीने स्वतःच्याच घराचा दरवाजा उघडून बेडमधील दागिने चोरल्याची कबुली दिली.

जप्त करण्यात आलेला मुद्देमाल ५,८५,०००/- रुपये किमतीचे ३४ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने (सोन्याची चैन व २ अंगठ्या),  १,३४,०००/- रुपये किमतीचा आयफोन १७ प्रो मोबाईल, २०,०००/- रुपये किमतीचा सॅमसंग कंपनीचा मोबाईल असे एकूण जप्त मुद्देमाल ७,३९,०००/- रुपये इतका आहे.

अटक करण्यात आलेले दोन्ही आरोपी हे पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्यांच्यावर यापूर्वीही शरीराविरुद्धचे गुन्हे दाखल आहेत. पुढील तपासासाठी आरोपींना सांगली ग्रामीण पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आले आहे.

ही कारवाई सांगलीचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे, सहा. पोलीस निरीक्षक प्रशांत निशाणदार, सायबर पोलीस ठाण्याच्या रुपाली बोबडे, तसेच पोलीस अंमलदार सुभाष सूर्यवंशी, राजाराम मुळे, अतुल माने, सुमित सूर्यवंशी, ऋतुराज होळकर, कॅप्टन गुंडवाडे आणि विजय पाटणकर यांच्या पथकाने केली.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.