Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

पुण्यात पावसाचा जोर कायम!

पुण्यात पावसाचा जोर कायम! 

पुणे : खरा पंचनामा 

पुणे शहर आणि परिसरात गेल्या पाच ते सहा दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने सोमवारी रात्री पुन्हा एकदा रौद्ररूप धारण केले. रविवारपाठोपाठ सोमवारी रात्री झालेल्या अतिमुसळधार पावसामुळे संपूर्ण पुण्याची दाणादाण उडाली आहे. सोमवारी रात्री १० वाजेपासून ते मंगळवारी सकाळी ९:३० वाजेपर्यंत पिंपरी-चिंचवड भागात सर्वाधिक २६८ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. याशिवाय लोहगाव येथे १७४ मिमी, तर शिवाजीनगर भागात ९७.५ मिमी पाऊस पडला.

सतत कोसळणाऱ्या या पावसामुळे शहरात झाडपडीच्या तब्बल २१२ घटना घडल्या आहेत. अनेक सोसायट्या आणि घरांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांचे सुरक्षित स्थलांतर करावे लागले. मुसळधार पावसामुळे रस्त्यांवर पाणी साचून पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली होती. एका बसमधील अडकलेले कर्मचारी आणि काही स्थानिक नागरिकांची अग्निशमन दलाच्या जवानांनी सुटका केली. अग्निशमन दलाचे जवान गेल्या ४८ ते ७२ तासांपासून सातत्याने मदतकार्यात व्यस्त आहेत.

सोमवारी रात्री झालेल्या या धडकी भरवणाऱ्या पावसामुळे रात्रीची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हाधिकाऱ्यांनी सोमवारपाठोपाठ मंगळवारीही शाळांना सुटी जाहीर केली होती. मंगळवारी तब्बल पाच दिवसांनंतर पुणेकरांना काही क्षणांसाठी सूर्यदर्शन झाले, मात्र काही वेळातच पुन्हा ढगाळ वातावरण होऊन पावसाला सुरुवात झाली.

हवामान विभागाचा इशारा
हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, पुण्यात पावसाचा जोर अद्याप कायम राहणार असून आज घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा 'ऑरेंज अलर्ट' जारी करण्यात आला आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.