सांगलीचा सुपुत्र अभिजीत भोसलेची चीनमधील आशियाई ॲथलेटिक्स स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड!
पूजा फडके
सांगली : खरा पंचनामा
सांगली स्पोर्ट्स फाऊंडेशनचा राष्ट्रीय खेळाडू अभिजीत संजय भोसले याची चीनमधील ऑर्डोस येथे होणाऱ्या पहिल्या २३ वर्षांखालील (U-23) आशियाई ॲथलेटिक्स स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड झाली आहे. या स्पर्धेसाठी अभिजीतसह संपूर्ण भारतीय ॲथलेटिक्स संघ चीनसाठी रवाना झाला आहे.
अभिजीतने जून महिन्यात रांची येथे झालेल्या २९ व्या सिनियर राष्ट्रीय स्पर्धेत 'डेकाथलॉन' या क्रीडा प्रकारात तब्बल ७१०० गुणांची कमाई केली. ही त्याची आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी ठरली. या कामगिरीच्या जोरावर त्याने स्पर्धेत चौथा क्रमांक पटकावला आणि चीनमध्ये होणाऱ्या पहिल्या २३ वर्षांखालील आशियाई स्पर्धेचे क्वालिफिकेशन (पात्रता) देखील निश्चित केले.
पहिली २३ वर्षांखालील आशियाई ॲथलेटिक्स स्पर्धा ९ जुलै ते १२ जुलै या कालावधीत ऑर्डोस, चीन येथे रंगणार आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताचे प्रतिनिधित्व करणारा अभिजीत सध्या 'भारतीय वायुसेने'मध्ये (Indian Air Force) कार्यरत आहे.
अभिजीतच्या या यशाबद्दल सांगली स्पोर्ट्स फाऊंडेशनचे अध्यक्ष मकरंद चितळे, कार्याध्यक्ष जतीन शहा, उपाध्यक्ष संजय परमणे, राजू बावडेकर आणि खजिनदार प्रमोद शिंदे यांनी त्याचे कौतुक करत त्याला पुढील वाटचालीस प्रोत्साहन दिले आहे. तर त्याला एस. एल. पाटील व अविनाश सावंत यांचे तंत्रशुद्ध मार्गदर्शन लाभत आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.