Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

अल्पवयीन मुलांच्या हाती वाहन देणाऱ्या पालकांनो सावधान!पाच जणांवर कारवाई : सांगली वाहतूक पोलिसांची धडक कारवाई

अल्पवयीन मुलांच्या हाती वाहन देणाऱ्या पालकांनो सावधान!
पाच जणांवर कारवाई : सांगली वाहतूक पोलिसांची धडक कारवाई

पूजा फडके 
सांगली : खरा पंचनामा 

अल्पवयीन मुलांकडून होणारे वाहन चालवणे आणि त्यामुळे होणारे अपघात रोखण्यासाठी सांगली वाहतूक नियंत्रण शाखेने आता कंबर कसली आहे. वाहतूक नियमांचे उल्लंघन टाळण्यासाठी आणि अपघातांना आळा घालण्यासाठी सांगली पोलिसांकडून अल्पवयीन वाहन चालकांविरुद्ध एक विशेष मोहीम राबवण्यात येत आहे.

या मोहिमेअंतर्गत पोलिसांनी थेट पालकांवरच कारवाईचा बडगा उगारण्यास सुरुवात केली आहे. दोन दिवसांत ५ पालकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दिनांक १३ आणि १४ जुलै २०२६ रोजी सांगली वाहतूक नियंत्रण शाखेने शहरात विशेष मोहीम राबवली. या दरम्यान ज्या पालकांनी आपल्या अल्पवयीन मुलांना दुचाकी किंवा चारचाकी वाहन चालवण्यास दिले होते, अशा ०५ पालक आणि वाहन मालकांवर मोटार वाहन अधिनियमांतर्गत कडक कारवाई करण्यात आली आहे.

भविष्यातही मोहीम सुरूच राहणार: पोलीस निरीक्षक अजय सिंदकर
वाहतूक नियंत्रण शाखा, सांगलीचे पोलीस निरीक्षक अजय सिंदकर यांनी सर्व पालक आणि वाहन मालकांना कडक इशारा दिला आहे. त्यांनी स्पष्ट केले की:
१८ वर्षांखालील मुलांना कोणत्याही परिस्थितीत दुचाकी किंवा चारचाकी वाहन चालवण्यास देऊ नका. अल्पवयीन मुलांनी वाहन चालवणे हा केवळ कायद्याचा भंग नसून, यामुळे त्यांच्या स्वतःच्या आणि इतर नागरिकांच्या जिवालाही मोठा धोका निर्माण होतो. भविष्यातही ही तपासणी मोहीम अशीच सुरू राहणार असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल."

पोलिसांचे जनतेला आवाहन
सांगली पोलिसांनी सर्व नागरिकांना वाहतूक नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आणि सुरक्षित वाहतुकीसाठी प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. आपल्या पाल्याचा जीव धोक्यात न घालता, त्यांना १८ वर्षे पूर्ण होईपर्यंत आणि रीतसर परवाना (Driving License) मिळेपर्यंत वाहने चालवू न देणे ही पालकांची सामाजिक आणि कायदेशीर जबाबदारी आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.