लाच घेणारा पोलीस अंमलदार एसीबीच्या जाळ्यात
चहाच्या टपरीवर सापळा रचून रंगेहात पकडले
नाशिक : खरा पंचनामा
तुझ्यावर खोटा गुन्हा दाखल केला, तर पेठ तालुक्यात तुझ्या कुटुंबाची जी प्रतिष्ठा आहे ती धुळीला मिळेल.... कायद्याचे रक्षण करणाऱ्या एका खाकी वर्दीतील अंमलदाराने एका व्यावसायिकाला ब्लॅकमेल करण्यासाठी वापरलेले हे शब्द आहेत.
कुटुंबाच्या बदनामीची भीती दाखवून आधी ६० हजार रुपये उकळल्यानंतर, पुन्हा ९० हजारांची लाच स्वीकारताना पेठ पोलीस ठाण्याच्या लाचखोर अंमलदाराला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) शुक्रवारी (दि. ११) रंगेहात पकडून अटक केली आहे. मनोज दगु गायकवाड (वय ३७) असे या संशयित पोलीस अंमलदाराचे नाव असून, या कारवाईमुळे खाकी वर्दीला लागलेला डाग पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.
तक्रारदार व्यावसायिक हे मूळचे गुजरातचे असून, त्यांचा चिकन विक्रीचा व्यवसाय आहे. या व्यवसायासाठी ते महाराष्ट्रातून कोंबड्या खरेदी करून कारने गुजरातला ने-आण करतात. जून महिन्यात कोंबड्यांची वाहतूक करत असताना पेठ पोलीस ठाण्याचा अंमलदार मनोज गायकवाड याने त्यांना वांगणी परिसरात अडवले. तू कोंबड्यांची नाही, तर गुटख्याची बेकायदेशीर तस्करी करतोस, असा खोटा आरोप लावत त्याने धमकावण्यास सुरुवात केली. व्यावसायिकाने सर्व वैध कागदपत्रे दाखवूनही गायकवाडने ऐकले नाही आणि कुटुंबाच्या प्रतिष्ठेची भीती घालून जूनमध्येच ६० हजार रुपये उकळले.
लाचखोराची भूक एवढ्यावरच भागली नाही. त्याने ५ जुलै रोजी पुन्हा फोन करून, गाड्या सुसाट जाऊ द्यायच्या असतील तर एक लाख द्यावे लागतील, अशी धमकी दिली. अखेर तडजोडीत ९० हजार रुपये ठरले. रोजच्या या त्रासाला कंटाळलेल्या व्यावसायिकाने नाशिक 'एसीबी'कडे तक्रार नोंदवली.
पेठ रोडवरील हॉटेल राऊसमोरील एका चहाच्या टपरीवर शुक्रवारी सायंकाळी गायकवाड लाचेची रक्कम घेण्यासाठी पोहोचला. तक्रारदाराकडून ९० हजारांची रोकड स्वीकारताच, दबा धरून बसलेल्या एसीबीच्या पथकाने त्याला रंगेहात पकडले. याप्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.