रेल्वे प्रवाशांनी चोरले सव्वा कोटींचे बेडशीट, टॉवेल, उश्या अन् ब्लँकेट्स
एसी कोचेसमध्ये केला हात साफ !
नवी दिल्ली : खरा पंचनामा
भारतीय रेल्वेच्या एसी डब्ब्यांमधून गेल्या ४ वर्षात १ कोटी २७ लाखांचे साहित्य गायब झाल्याची धक्कादायक माहिती समोर अली आहे. यात बीडशीट, ब्लँकेट, उश्या, टॉवेल यांचा यांचा समावेश आहे. साधारणपणे दर १००० प्रवाशांमधील १ प्रवासी किमान १ साहित्य घेऊन जात असल्याचं द इंडियन एक्सप्रेसच्या तपासणीत आले आहे.
द इंडियन एक्सप्रेसने आरटीआयमध्ये भारतीय रेल्वेच्या ६९ विभागांमध्ये अर्ज केले. यामध्ये ५४ विभागांमधून १८ पैकी १६ बाबतींत माहिती मिळाली. जानेवारी २०२२ ते मे २०२६ पर्यंत १ कोटी २७ लाख रुपयांचं साहित्य प्रवाशांकडून चोरी झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. २०२२ ते २०२५ पर्यंत या चोऱ्यांमध्ये ५६ टक्के वाढ झाली आहे. आरटीआयच्या माहितीनुसार या चोऱ्यांमुळे कंत्राटदाराला १०४.५१ कोटी रुपयांचे नुकसान झाले असून या नुकसानाची भरपाई कंत्राटदाराने नेमलेल्या त्या डब्ब्यांमधील कराचाऱ्यांच्या वेतनातून केली जाते.
देशातील १० पैकी ७ विभागांमध्ये सर्वाधिक चोऱ्या होण्याचे प्रमाण असून ते एकूण ६७ टक्के असल्याचे आकडेवारी दर्शवते. यात बिकानेर, जोधपूर आणि जयपूर, रांची, दिल्ली, मुंबई, सोनापूर आणि दानापूर, अहमदाबाद आणि बिलासपूर यांचा समावेश आहे.
आकडेवारीत सर्वाधिक चोरी झालेल्या वस्तूंमध्ये टॉवेलचा पहिला क्रमांक आहे. चार वर्षात ४६.५४ लाख टॉवेल चोरीला गेलेत. त्यानंतर ४१.१३ लाख बेडशिट, २३.५९ लाख उश्यांचे कव्हर, १२.९५ लाख ब्लॅकेट्स आणि २.७६ लाख उश्या अशी चोरीला गेलेल्या वस्तूंची यादी आहे. RTI च्या माहितीनुसार बिकानेर, रांची येथे सर्वाधिक चोऱ्यांची नोंद केली गेली. त्याशिवाय बिकानेर विभागातून २५.७६ लाख वस्तू, रांचीतून ९.३१ लाख आणि दिल्लीतून ८.२१ लाख वस्तू चोरीला गेल्याची नोंद आहे. बिकानेरमध्ये सर्वाधिक १२.४२ लाख बेडशीट्स चोरीला गेले आहेत. या कालावधीत त्या विभागात चोरीला गेलेल्या एकूण वस्तूंमध्ये जवळपास निम्मे बेडशिट्स आहेत.
सर्वाधिक चोरी झालेल्या १० विभागांमध्ये सर्वात जास्त टॉवेलची चोरी झाली आहे. यात एकट्या दिल्ली विभागात ४.७८ लाख टॉवेल चोरीला गेले असून सदर विभागातील एकूण चोरीपैकी टॉवेलचे प्रमाण तब्बल ५८ टक्के आहे. रांची विभागात ३ लाख ८८ हजार टॉवेल चोरीला गेले असून त्याचं प्रमाण एकूण चोरीपैकी ४२ टक्के आहे. मुंबईत हेच प्रमाण ३ लाख ५७ हजार टॉवेल्स असून त्याची टक्केवारी ४४ टक्के आहे. दानापूरमध्ये हेच प्रमाण अनुक्रमे ३ लाख ३७ हजार टॉवेल्स व ५९ टक्के इतकं आहे. अहमदाबादमध्ये ३ लाख २२ हजार टॉवेल्स चोरीला गेले असून त्याचं प्रमाण ४६ टक्के आहे. तर जयपूरमध्ये हेच प्रमाण २ लाख ५२ हजार टॉवेल्स आणि ५६ टक्के इतकं आहे. सोनापूर विभागात १.५८ लाख उश्यांच्या कव्हर्सची चोरी झाली असून त्याचं प्रमाण ३९ टक्के आहे. तर बिलासपूर विभागात १.५५ लाख कव्हर्सची चोरी झाली असून त्याचं प्रमाण ३४ टक्के आहे. सर्वाधिक ब्लँकेट्सची चोरी जोधपूरमध्ये झाली असून तेथे ३.४ लाखांहून अधिक ब्लँकेट्स चोरी झाले आहेत.
२०२२ पासून बिकानेर विभागात चोरी झालेल्या वस्तूंमध्ये वाढ होऊन ती २.९९ लाखांवरून १२.३४ लाखांपर्यंत पोहोचली आहे. तर सोनापूर विभागात चोरी झालेल्या वस्तूंमध्ये वाढ होऊन ती ३,४४८ वरून ३.०१ लाखांपर्यंत पोहोचली आहे.
वाढ झालेले इतर विभागः २०२२ पासून दानापूर विभागात चोरी झालेल्या वस्तूंच्या संख्येत ७८,०९५ ने वाढ झाल्याने चोरीत ९१ टक्के वाढ झाली आहे. धनबाद विभागात चोरी झालेल्या वस्तूंच्या संख्येत ५५,९०६ ने वाढ झाल्याने चोरीत ९१ टक्के वाढ झाली आहे. रांची विभागात चोरी झालेल्या वस्तूंच्या संख्येत ७७,३३२ ने वाढ झाल्याने चोरीत ४५ टक्के वाढ झाली आहे आणि जोधपूर विभागात चोरी झालेल्या वस्तूंच्या संख्येत ९४,६७९ ने वाढ झाल्याने ४६ टक्के चोरीत वाढ झाली आहे.
चोरीच्या घटनांमध्ये घट झालेल्या विभागात दिल्ली प्रथम क्रमांकावर आहे. दिल्ली विभागात चोरीच्या घटनांमध्ये ७९ टक्के घट झाली असून चोरीच्या वस्तूंची संख्या ३.२७ लाखांवरून ६८,०१३ वर आली आहे. तर अहमदाबाद विभागात ८३ टक्क्यांनी आणि समस्तीपूर विभागामध्ये ८६ टक्क्यांनी चोरीत घट झाली आहे. तर तिरुचिरापल्ली आणि पालक्काड या २ दक्षिण विभागांत चोरीची एकही नोंद झालेली नाही आहे.
द इंडियन एक्सप्रेसने अनेक कंत्राटदारांशी संवाद साधला ज्यामध्ये एका कंत्राटदाराने सांगितले या घटनांमुळे त्यांना रेल्वेसोबतचा करार रद्द करावा लागला. त्यांनी असेही सांगितले की, या समस्येचा सर्वाधिक फटका त्यांनाच बसत होता कारण काही घटनांमध्ये चोरीला गेलेल्या वस्तूंची भरपाई करण्यासाठी कंत्राटदार त्यांच्याच पगारातून पैसे कापून घेत असत. “ब्लँकेट्सची चोरी ही आमच्यासाठी एक मोठी समस्या आहे," असे मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागातील एका ब्लँकेट वितरण करणाऱ्या कंपनीच्या सुपरवायजरने सांगितले.
"या घटनांमुळे आमच्या पगारातून हिस्सा कमी केला जातो. आमचा रेल्वेसोबत ३ वर्षांचा करार होता पण पेमेंटमधील विलंबामुळे आम्हाला तो १४ महिन्यांतच थांबवावा लागला. ५ रेल्वे गाड्यांमध्ये एकूण ६० कर्मचारी असतात. चोरी झालेल्या वस्तूंमधून ते प्रत्येकी उश्यांचे ११५ रुपये, चादरीचे १९८ रुपये, उश्यांच्या कव्हर्सचे ५५ रुपये, टॉवेलचे ४८ रुपये आणि ब्लॅकेटचे ३४३ रुपये वसूल करतात," असे सुपरवायजरने सांगितले. एका दिवसाचे कर्मचाऱ्यांना ७०० रुपये मिळतात पण या चोरीच्या घटनांमुळे दर महिन्याला २००० ते ३००० रुपये वेतनातून कमी केले जातात.
रेल्वे मंत्रालयाने हा प्रकार गंभीर असल्याचे सांगितले असून चोरी रोखण्यासाठी उपाय आणि दोषींवर कारवाई करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले आहे. या चोरीमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांचा सहभाग असल्याचे कोणतेही पुरावे नसल्याचेही स्पष्ट केले.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.