Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

मुंबई पोलिसाचं आंदोलनकर्त्या तरुणीसोबत किळसवाणं कृत्य; कठोर कारवाईची मागणी

मुंबई पोलिसाचं आंदोलनकर्त्या तरुणीसोबत किळसवाणं कृत्य; कठोर कारवाईची मागणी

मुंबई : खरा पंचनामा 

नवी दिल्लीतील जंतर मंतर इथं सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मुंबईत मोठ्या प्रमाणात तरुणाई रस्त्यावर उतरत आहे. मात्र व्यवस्थेविरोधात आपला असंतोष मांडण्यासाठी आंदोलन करणाऱ्या या तरुणांसोबत काही पोलीस कर्मचारी संतापजनक कृत्य करत असल्याचं समोर आलं आहे.

आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांना अंमली पदार्थार्थांच्या खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देणाऱ्या पोलिसाचा व्हिडिओ व्हायरल झालेला असतानाच आता आणखी एक गंभीर प्रकार उघड झाला आहे. दादर येथील विद्यार्थी आंदोलनादरम्यान तरुणीला एका व्यक्तीने चुकीच्या ठिकाणी स्पर्श करत तिचा विनयभंग केल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. तरुणीचा विनयभंग करणारा व्यक्ती पोलीस दलात कार्यरत असल्याचं सांगितलं जात असून हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर मुंबई पोलीस दलाविरोधात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

विद्यार्थ्यांचा आक्रोश रस्त्यावर दिसू नये, यासाठी सरकारने मुंबईत काही दिवसांसाठी जमावबंदी लादण्याचा निर्णय घेतला. मात्र सरकारच्या या निर्णयानंतरही तरुण उत्स्फूर्तपणे रस्त्यावर उतरत असून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत. त्यामुळे जमावबंदी आदेशाच्या उल्लंघनाचा दाखला देत पोलिसांकडून आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतलं जात आहे. अशातच नुकतंच मुंबईतील एका आंदोलनादरम्यान तरुणांची धरपकड सुरू असताना सिव्हिल ड्रेसवरील कर्मचाऱ्याने तरुणीला चुकीच्या ठिकाणी स्पर्श केल्याचं समोर आलं. या प्रकारानंतर विविध राजकीय नेत्यांनी चीड व्यक्त करत कठोर कारवाईची मागणी केली आहे.

राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी म्हटलं आहे की, "हा व्हिडिओ बघून डोक्याची तिडीक उठली. कोण आहे नराधम? याच्या मुलीच्या वयाच्या मुलीसोबत हा किती किळसवाण कृत्य करतोय. हा पोलीस असेल तर पहिले याला निलंबित नाही तर पोलीस दलातून बडतर्फ करा आणि विनयभंगाचा गुन्हा दाखल करून गजाआड करा. एक वेगळी प्रतिष्ठा असलेल्या महाराष्ट्र पोलीस दलाला लागलेली ही कीड आहे," अशा शब्दांत रोहित पवार यांनी आपला राग व्यक्त केला आहे.

काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांनीही या व्हिडिओवरून संताप व्यक्त करत कारवाईची मागणी केली आहे. "हा पोलीस कर्मचारी काय करतोय? त्याने महिला पोलिसाला का पुढे केलं नाही? हे अजिबात खपवून घेतलं जाणार नाही," असं त्या म्हणाल्या.

मोटार परिवहन विभागातील पोलिस चालक आंदोलक तरुणांना समज देताना 'पुन्हा दिसल्यास खिशात ड्रग्ज टाकून अडकवेन' अशी धमकी देत असल्याचा प्रकार व्हिडीओमध्ये कैद झाला आहे. धमकी देणारा पोलिस चालक पवन सांगळे याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर, याची गंभीर दखल घेत त्याला पदावरून हटवण्यात आले आहे. या प्रकाराची चौकशी सुरू करण्यात आली असून त्यानुसार पुढील कारवाई केली जाणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.