जगन्नाथ रथयात्रेदरम्यान चेंगराचेंगरी, ३ भाविकांचा मृत्यू, २०० गंभीर जखमी
पुरी : खरा पंचनामा
ओडिशातील प्रसिद्ध पुरी येथील भगवान जगन्नाथ रथयात्रेला यंदा मोठ्या उत्साहात सुरुवात झाली. देशभरातील लाखो भाविक भगवान जगन्नाथ, बलभद्र आणि देवी सुभद्रा यांच्या दर्शनासाठी पुरीमध्ये दाखल झाले होते. मात्र, या उत्सवाला गुरुवारी गालबोट लागले आहे. रथयात्रेदरम्यान झालेल्या प्रचंड गर्दीमुळे चेंगराचेंगरीची घटना घडली असून, त्यात ३ भाविकांचा मृत्यू झाला आहे. तसेच २०० हून अधिक जण जखमी झाल्याची माहिती आहे.
दरवर्षीप्रमाणे यंदाही रथयात्रेसाठी भाविकांची मोठी गर्दी झाली होती. भगवान जगन्नाथ, बलभद्र आणि सुभद्रा यांच्या भव्य रथांचे दर्शन घेण्यासाठी आणि रथ ओढण्याचा मान मिळवण्यासाठी लाखो भक्त 'बडा दंडा' येथे एकत्र जमले होते. रथ पुढे सरकण्यास सुरुवात होताच अनेक भाविक रथाच्या जवळ गेले. यामुळे अचानक धक्काबुक्की सुरू झाली आणि काही वेळातच परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली.
गर्दीमुळे भाविक जमिनीवर पडले. त्यानंतर त्यांच्या अंगावरून अनेक लोक गेल्याने चेंगराचेंगरी झाली. या गोंधळात अनेकांना श्वास घेण्यास त्रास झाला, तर काहीजण गंभीर जखमी झाले. घटनास्थळी उपस्थित असलेल्या सुरक्षा कर्मचाऱ्यांनी तातडीने मदतकार्य सुरू केले. जखमींना त्वरित पुरी रुग्णालयात दाखल करण्यात आले. गंभीर जखमी असलेल्या काही भाविकांवर उपचार सुरू असताना तिघांचा मृत्यू झाला.
अनेक जखमींवर उपचार सुरू असून काहींची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले जात आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस, ODRAF तसेच आरोग्य विभागाची पथके तातडीने घटनास्थळी पोहोचली. लाखो भक्तांच्या श्रद्धेचा उत्सव असलेल्या जगन्नाथ रथयात्रेला लागलेल्या या दुर्दैवी गालबोटामुळे खळबळ उडाली आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.