पंढरपुरातील मंत्र्यांच्या आढावा बैठकांना आता लगाम
मुख्यमंत्री कार्यालयातूनच सूत्रं हलणार
पंढरपूर : खरा पंचनामा
आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर विविध विभागाच्या नियोजनाचा आढावा घेतला जातो. अनेक विभागाचे मंत्री पंढरपुरात येऊन या बैठका घेत असतात. मात्र, मंत्र्यांच्या या बैठकांना चाप लावण्याचे नियोजन सुरू असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयातूनच तसा आदेश काढला जाईल, असे सूतोवाच पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी केले आहे.
पंढरपुरात आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर नियोजनाचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदे आले होते. उपमुख्यमंत्री झाल्यानंतरही त्यांनी गेल्या वर्षी नियोजनाची पाहणी करण्यासाठी पंढरपुरात हजेरी लावली होती. तसेच, मागील सरकारच्या काळात तत्कालीन आरोग्य मंत्री तानाजी सावंत हेही आढावा बैठक घ्यायचे.
सावंत यांच्याप्रमाणेच विद्यमान आरोग्य मंत्री प्रकाश आबीटकर यांनीही शनिवारी पंढरपुरात येऊन आरोग्य विभागाच्या तयारीचा आढावा घेतला. आषाढी वारीच्या तयारीच्या आढावा बैठकीसाठी मुख्यतः शिवसेना आणि भाजपचेच मंत्री येतात. त्यामुळे नेमके कोणत्या मंत्र्यांच्या आढावा बैठकीला चाप लागणार, अशी चर्चा रंगली आहे. आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तयारीची पाहणी करण्यासाठी पंढरपुरात येणार की नाही, याची उत्सुकता आहे.
आषाढी यात्रेच्या निमित्ताने चंद्रभागा वाळवंट स्वच्छता मोहीम हाती घेतली आहे. त्या स्वच्छतेची पाहणी करण्यासाठी पालकमंत्री जयकुमार गोरे आज (ता. ०५ जुलै) पंढरपुरात आले होते. त्यावेळी त्यांनी यंदाची वारी पर्यावरणपूरक आणि प्लास्टिकमुक्त करण्याचा संकल्प केल्याचे सांगितले. त्यानंतर माध्यमाशी बोलताना त्यांनी आढावा बैठकांवर भाष्य केले.
आषाढी यात्रेच्या निमित्ताने विविध विभागाच्या वतीने आढावा बैठका सुरू आहेत. या बैठकांमुळे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा वेळ वाया जातो, त्याचा कामकाजावर परिणाम होत आहे. त्याची दखल पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी घेतली असून लवकरच अशा आढावा बैठकांना चाप लावण्यात येणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयातून लवकरच तसा आदेश काढला जाईल, असेही पालकमंत्री गोरे यांनी सांगितले.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.