शिवसेना शिंदे गटाच्या महिला उपजिल्हाप्रमुखांना अटक, तिघांचा शोध सुरु
नवी मुंबई : खरा पंचनामा
नवी मुंबईतील राजकीय वर्तुळातून एक अतिशय मोठी बातमी समोर आली आहे. शिवसेना शिंदे गटाच्या महिला आघाडीच्या उपजिल्हाप्रमुख पूजा बनसोडे यांना तुर्भे पोलिसांनी अटक केली आहे. एका व्यावसायिकाकडे खंडणी मागितल्या प्रकरणी ही अटक झाली आहे. तुर्भे पोलीस बनसोडे यांच्या इतर तीन साथीदारांचा शोध घेत आहेत. एवढ्या मोठ्या पदावरील राजकीय व्यक्तीला अशाप्रकारे अटक झाल्याने नवी मुंबईच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, नवी मुंबईतील तुर्भे परिसरात एका व्यावसायिकाचा भंगाराचा (स्क्रॅप) मोठा व्यवसाय आहे. या व्यावसायिकाकडे आरोपी पूजा बनसोडे यांनी २ लाख रुपयांच्या खंडणीची मागणी केली होती. या पैशांसाठी त्या व्यावसायिकावर सतत दबाव टाकत होत्या, असा आरोप आहे.
संबंधित भंगार व्यावसायिकाने ही खंडणी देण्यास स्पष्ट नकार दिला. खंडणी देण्यास नकार दिल्याने संतप्त झालेल्या पूजा बनसोडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी व्यावसायिकाला बेदम मारहाण केली, तसेच अत्यंत खालच्या भाषेत शिवीगाळ करत धमकावल्याचा आरोप आहे. या छळाला कंटाळून अखेर पीडित व्यावसायिकाने तुर्भे पोलीस ठाण्यात धाव घेत अधिकृत तक्रार दाखल केली.
व्यावसायिकाच्या तक्रारीवरून तुर्भे पोलिसांनी त्वरित कारवाई करत शिवसेना शिंदे गटाच्या महिला नेत्या पूजा बनसोडे यांना अटक केली आहे. या गुन्ह्यात केवळ पूजा बनसोडे एकट्याच नव्हत्या, तर त्यांच्यासोबत इतर तीन जणही सामील होते. या घटनेनंतर ते तिन्ही आरोपी सध्या फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. या हायप्रोफाईल खंडणी प्रकरणामुळे नवी मुंबईत विविध चर्चांना उधाण आलं आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.