अत्याचारातील संशयिताला पोलिस ठाण्यात आणला, चप्पल हातात घातली अन् पसार झाला
'पोलिसांचीच मदत' नातेवाईकांना संशय
अहिल्यानगर : खरा पंचनामा
अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात नोंद झालेल्या अत्याचार प्रकरणातील संशयित आरोपी पोलिस ठाण्यातून पलायन केल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेत एका पोलिस कर्मचाऱ्याने आरोपीला मदत केल्याचा आरोप पीडितेच्या नातेवाईकांनी केला असून, संपूर्ण घटनेची सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, 16 जुलै रोजी अत्याचार प्रकरणातील संशयित गणेश बाळासाहेब म्हस्के याला गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असताना पाथर्डी पोलिस ठाण्यात आणण्यात आले होते. त्याला पोलिस ठाण्यातील एका खोलीत बसविण्यात आले होते. या प्रकरणात संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल करू नये, यासाठी एका राजकीय पक्षाच्या राज्यस्तरीय नेत्याकडून स्थानिक पोलिसांवर दबाव आणल्याचा आरोपही करण्यात आला आहे. मात्र, पोलिस निरीक्षक आनंद कोकरे यांनी संशयिताला ताब्यात घेऊन पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू केल्याचे सांगितले जात आहे.
दरम्यान, संबंधित खोलीत एक पोलिस कर्मचारी गेल्यानंतर संशयितासोबत गृहरक्षक दलाचा जवान तैनात करण्यात आला होता. काही वेळाने जवान खोलीबाहेर पडताच संशयिताने तेथून पलायन केल्याचा दावा करण्यात आला आहे. आरोपीने पळून जाण्यासाठी हातात चपला घेतल्याची चर्चा परिसरात आहे. मात्र, याबाबत पोलिसांकडून अधिकृत पुष्टी करण्यात आलेली नाही.
संशयित फरार झाल्याची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक आनंद कोकरे यांनी संबंधित कर्मचाऱ्याला संशयिताला तातडीने हजर करण्याचे तोंडी निर्देश दिल्याची माहिती समोर आली आहे. याचवेळी, पीडितेच्या नातेवाईकांनी संबंधित पोलिस कर्मचाऱ्यावर गंभीर आरोप केले आहेत. फिर्याद मागे घेण्यासाठी दबाव टाकण्यात आल्याचा तसेच खोटे गुन्हे दाखल करण्याची धमकी दिल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
या संदर्भात पोलिस निरीक्षक आनंद कोकरे यांनी सांगितले की, "संशयित आरोपीला पळून जाण्यास कोणत्याही पोलिस कर्मचाऱ्याने मदत केली असल्याचे चौकशीत निष्पन्न झाल्यास संबंधिताविरुद्ध विभागीय कारवाईचा प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविण्यात येईल." सध्या या संपूर्ण प्रकरणाची चौकशी सुरू असून, सीसीटीव्ही फुटेजची पडताळणी करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.