Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

तीन मजली चाळ कोसळली: पाच चिमुकल्यांसह सहा जणांचा मृत्यू

तीन मजली चाळ कोसळली: पाच चिमुकल्यांसह सहा जणांचा मृत्यू

मुंबई : खरा पंचनामा 

मुंबईतील मानखुर्दमधील जनता नगर परिसरात रविवारी रात्री तीन मजली कच्च्या चाळीचा भाग कोसळल्याने पाच लहान मुले आणि एका महिलेचा जागीच मृत्यू झाला, तर एक तरुण जखमी झाला.

ही चाळ धोकादायक असल्याने रहिवासी घरातील सामान बाहेर काढत असतानाच अचानक संपूर्ण बांधकाम कोसळल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. घटनेनंतर राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल, मुंबई अग्निशमन दल, पोलिस, महानगरपालिका आणि रुग्णवाहिका तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या. युद्धपातळीवर बचावकार्य राबवून ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्यात आले.

रविवारी रात्री मानखुर्दमधील हनुमान मंदिराजवळील जनता नगर परिसरातील चाळ क्रमांक ५ मध्ये ही घटना घडली. तळमजल्यासह तीन मजली कच्च्या बांधकामातील दोन ते तीन घरे क्षणार्धात कोसळली. ढिगाऱ्याखाली अनेक रहिवासी अडकले. माहिती मिळताच बचाव पथके घटनास्थळी दाखल झाली आणि बचावकार्य सुरू करण्यात आले. जखमींना तातडीने गोवंडी येथील पंडित मदन मोहन मालवीय शताब्दी रुग्णालय आणि घाटकोपर येथील राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, शताब्दी रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या एका महिलेसह तीन लहान मुली आणि एका लहान मुलाला मृत घोषित करण्यात आले. तर राजावाडी रुग्णालयात आणखी एका लहान मुलाचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. या घटनेत एकूण सहा जणांचा मृत्यू झाला असून एका तरुणावर उपचार सुरू आहेत. त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.