Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

१०.५७ कोटी रुपयांच्या बोगस बिल घोटाळ्याचा पर्दाफाश, मुख्य सूत्रधार कल्पेश कुंभारला अटककोल्हापूर केंद्रीय जीएसटी आयुक्तालयाची पहिली ऐतिहासिक कारवाई

१०.५७ कोटी रुपयांच्या बोगस बिल घोटाळ्याचा पर्दाफाश, मुख्य सूत्रधार कल्पेश कुंभारला अटक
कोल्हापूर केंद्रीय जीएसटी आयुक्तालयाची पहिली ऐतिहासिक कारवाई

कोल्हापूर : खरा पंचनामा 

करचुकवेगिरी करणाऱ्या आणि बोगस व्यवहारांद्वारे शासनाची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणाऱ्या रॅकेटविरोधात केंद्रीय वस्तू व सेवा कर (CGST) कोल्हापूर आयुक्तालयाच्या करचोरी विरोधी पथकाने (Anti-Evasion Wing) एक मोठी आणि ऐतिहासिक कारवाई केली आहे. माल किंवा सेवांचा कोणताही प्रत्यक्ष पुरवठा न करता केवळ कागदावर कोट्यवधी रुपयांचे बनावट इनपुट टॅक्स क्रेडिट (ITC) मिळवणे, त्याचा वापर करणे आणि ते पुढे पाठवणे (Passing on) या प्रकरणी मुख्य सूत्रधार कल्पेश बालासो कुंभार (वय ४०, रा. ११९/बी कुंभार गल्ली, दत्त मंदिर जवळ, घुडेवाडी आवळी खुर्द, कोल्हापूर) याला ६ जुलै २०२६ रोजी अटक करण्यात आली आहे.
कोल्हापूर सीजीएसटी आयुक्तालयाच्या इतिहासातील ही पहिलीच अटक असल्याने या कारवाईला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. ही धडक कारवाई कोल्हापूर सीजीएसटी आयुक्तालयाचे आयुक्त सुमित कुमार यादव आणि करचोरी विरोधी पथकाचे संयुक्त आयुक्त रोहित जोशी यांच्या थेट मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या शोधमोहीम व अटक करणाऱ्या पथकामध्ये सहाय्यक आयुक्त राम शंकर मीना, अधीक्षक गौतम कुमार, अधीक्षक स्वप्नील वगरे, अधीक्षक अभिषेक रंजन, निरीक्षक मयूर शिंदे आणि हवालदार अजित बोरागे यांचा समावेश होता.

या कारवाईची सुरुवात 'मे. रचना अॅग्रो सर्व्हिसेस /निर्मिती इंडस्ट्रीज' (पत्ता शिरोली पुलाची, MIDC S 585, तालुका हातकणंगले, डिस्ट्रिक्ट कोल्हापूर) या फर्मविरुद्ध सुरू झालेल्या गोपनीय तपासातून झाली. विभागाच्या पथकाने केलेल्या सखोल डेटा विश्लेषण आणि प्रत्यक्ष पडताळणीमध्ये केवळ करचोरीच्या उद्देशाने उभारलेले बोगस कंपन्यांचे (Shell Entities) एक मोठे जाळे समोर आले. तपासादरम्यान असे निष्पन्न झाले की, 'मे. रचना अॅग्रो सर्व्हिसेस / निर्मिती इंडस्ट्रीज'चा प्रोप्रायटर आणि 'मे. निर्मिती कास्टिंग इंडस्ट्रीज' व 'मे. महालक्ष्मी कास्ट इंडस्ट्रीज'चा भागीदार असलेला कल्पेश बालासो कुंभार हाच या संपूर्ण घोटाळ्याचा मुख्य मास्टरमाइंड होता. त्याने स्वतःच्या नातेवाईकांच्या आणि निकटवर्तीयांच्या ओळखपत्रांचा गैरवापर करून किमान ६ बोगस कंपन्या स्थापन केल्या होत्या. या कंपन्यांच्या माध्यमातून कोणत्याही वस्तू किंवा सेवांची प्रत्यक्ष खरेदी-विक्री न करता, केवळ एकमेकांना आणि इतर कंपन्यांना जीएसटीची बोगस बिले जारी केली होती व १०.५७ कोटी रुपयांचे बनावट इनपुट टॅक्स क्रेडिट (ITC) पास केले होते.

जीएसटी कायद्याच्या कलम ७० अंतर्गत नोंदवलेले जबाब आणि गोळा करण्यात आलेल्या भक्कम दस्तऐवजांवरून हे सिद्ध झाले आहे की, प्रत्यक्षात कोणताही व्यापार झालेला नव्हता. कल्पेश कुंभारचे हे कृत्य सीजीएसटी कायदा, २०१७ च्या कलम १३२(१) (ब) आणि (क) अन्वये गंभीर गुन्हा आहे. घोटाळ्याची रक्कम ५ कोटी रुपयांपेक्षा जास्त असल्याने हा गुन्हा कलम १३२ (१) (आय) अंतर्गत अजामीनपात्र (Non-bailable) आणि दखलपात्र (Cognizable) ठरतो. त्यानुसार कल्पेश कुंभारला अटक करून माननीय न्यायालयासमोर हजर केले असता, न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. या बोगस क्रेडिटचा लाभ घेणाऱ्या इतर कंपन्यांचा आणि सहकाऱ्यांचा शोध घेण्यासाठी पथक पाठवण्यात आले आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.