Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

नीट पेपरफुटी प्रकरणात मोठा ट्विस्ट, शिवराज मोटेगावकरचा मोबाईल तपासला अन् CBI चे डोळे पांढरे !

नीट पेपरफुटी प्रकरणात मोठा ट्विस्ट, शिवराज मोटेगावकरचा मोबाईल तपासला अन् CBI चे डोळे पांढरे !

लातूर : खरा पंचनामा 

देशभरात खळबळ उडवून देणाऱ्या नीट (NEET) परीक्षा पेपरफुटी प्रकरणात आतापर्यंतचा सर्वात मोठा आणि धक्कादायक खुलासा झाला आहे. या प्रकरणातील संशयित आरोपी शिवराज मोटेगावकर याच्या जामीन अर्जाला तीव्र विरोध करताना केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) न्यायालयासमोर तपासातील असा काही कच्चाचिठ्ठा मांडला आहे, ज्यामुळे संपूर्ण शिक्षण व्यवस्था हादरून गेली आहे. नीटचा पेपर काढणाऱ्यांनी चक्क ५ लाख रुपयांच्या बदल्यात केमिस्ट्री (रसायनशास्त्र) विषयाचे प्रश्न फोडल्याचे सीबीआयच्या तपासात अधिकृतपणे उघड झाले आहे.

सीबीआयने कोर्टाला दिलेल्या माहितीनुसार, शिवराज मोटेगावकर याने या संपूर्ण पेपरफुटी प्रकरणातील मुख्य सूत्रधार पी. व्ही. कुलकर्णी याच्याकडून हे गोपनीय प्रश्न मिळवले होते. या प्रश्नांच्या खरेदी-विक्रीसाठी ५ लाख रुपयांची मोठी देवाणघेवाण झाली होती. मोटेगावकरचा मुलगा हा कुलकर्णी यांच्या काही ठराविक विद्यार्थ्यांच्या कोचिंग सेंटरचा विद्यार्थी होता. याच ओळखीचा आणि संबंधांचा गैरफायदा घेत कोचिंग सेंटरच्या माध्यमातून ही प्रश्नपत्रिका मिळवण्यात आली होती.

तपासादरम्यान सीबीआयने जेव्हा शिवराज मोटेगावकरचा मोबाईल फोन जप्त करून त्याची फॉरेन्सिक तपासणी केली, तेव्हा त्यात धक्कादायक पुरावे हाती लागले. मोटेगावकरच्या मोबाईलमध्ये केमिस्ट्री विषयाचे तब्बल १३२ हस्तलिखित (Handwritten) प्रश्न आढळून आले. इतकेच नाही तर मूळ प्रश्नपत्रिकेचे ३६ थेट फोटो (इमेजेस) देखील त्याच्या मोबाईलमध्ये जप्त करण्यात आले आहेत.

या प्रकरणातील सर्वात गंभीर आणि सीबीआयला चक्रावून टाकणारी बाब म्हणजे, मोटेगावकरच्या फोनमध्ये सापडलेल्या १३२ प्रश्नांपैकी चक्क १११ प्रश्न हे प्रत्यक्ष नीट परीक्षेच्या मुख्य प्रश्नपत्रिकेत 'जसेच्या तसे' आले होते! यावरून हा पेपरफुटीचा कट किती अचूक आणि सुनियोजित पद्धतीने रचला गेला होता, हे सीबीआयने न्यायालयासमोर सिद्ध केले आहे.

मोटेगावकरच्या जामीन अर्जावर सुनावणी सुरू असताना सीबीआयने हा भक्कम डेटा आणि तांत्रिक पुरावे कोर्टासमोर सादर केल्यामुळे आता मोटेगावकरच्या अडचणीत प्रचंड वाढ झाली आहे. सीबीआयच्या या थेट पुराव्यांनंतर आता सीबीआय कोर्ट मोटेगावकरचा जामीन मंजूर करणार की त्याला कोठडीतच ठेवणार, याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.