सुट्टीच्या दिवशीही काम.. FDA च्या 29 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची थेट मंत्र्यांकडेच तक्रार
तुकाराम मुंढेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
मुंबई : खरा पंचनामा
छत्रपती संभाजीनगर येथील राज्य अन्न व औषध प्रशासन प्रयोगशाळेत कामकाजाच्या पद्धतीवरून अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आल्याची माहिती आहे.
प्रयोगशाळेतील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांकडून विविध प्रकारची कामे करून घेतली जात असून, कामाच्या नियोजनाबाबत तसेच कार्यपद्धतीबाबत काही कर्मचाऱ्यांनी आक्षेप नोंदवले आहेत. या पार्श्वभूमीवर 29 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी एकत्रितपणे मंत्री नरहरी झिरवाळ यांच्याकडे FDA आयुक्त तुकाराम मुंढे यांची तक्रार केल्याने या प्रकरणाची चर्चा सुरू झाली आहे.
दरम्यान, कर्मचाऱ्यांनी केलेल्या आरोपांवर तुकाराम मुंढे यांनी स्पष्टीकरण दिले आहे. छत्रपती संभाजीनगर येथील अन्न व औषध प्रशासनाच्या प्रयोगशाळेतील कर्मचाऱ्यांना कामाच्या गरजेनुसार विविध जबाबदाऱ्या देण्यात येतात, असे त्यांनी स्पष्ट केले.
प्रयोगशाळेतील कामकाजाच्या आवश्यकतेनुसार कर्मचाऱ्यांना दोन पाळ्यांमध्ये काम देण्यात आले आहे. मात्र, कोणत्याही कर्मचाऱ्याकडून अतिरिक्त काम करून घेतले जात नसल्याचे मुंढे यांनी सांगितले. प्रत्येक कर्मचाऱ्याकडून आठवड्याला नियमानुसार अपेक्षित असलेले 48 तासांचेच काम करून घेतले जाते. त्यापेक्षा जास्त कामाचा भार कर्मचाऱ्यांवर टाकण्यात आलेला नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
"प्रयोगशाळेतील कामकाजाच्या गरजेनुसार कर्मचाऱ्यांना विविध कामे आणि जबाबदाऱ्या देण्यात येतात. गरजेनुसार दोन पाळ्यांमध्ये कामाचे नियोजन करण्यात आले आहे. मात्र, कोणत्याही कर्मचाऱ्याकडून अतिरिक्त काम करून घेतले जात नाही. आठवड्याला नियमानुसार अपेक्षित असलेले 48 तासांचेच काम घेतले जाते. त्यामुळे कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त कामाचा भार टाकल्याचे आरोप वस्तुस्थितीला धरून नाहीत," असे तुकाराम मुंढे यांनी म्हटले आहे.
29 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी एकत्रितपणे तक्रार केल्याने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली जाणार का, याकडे आता लक्ष लागले आहे. तक्रारीतील मुद्द्यांची चौकशी केली जाणार का किंवा संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून स्वतंत्रपणे माहिती घेतली जाणार का, याबाबत अद्याप स्पष्टता नाही.
एकीकडे कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी कार्यपद्धतीबाबत आक्षेप नोंदवले आहेत, तर दुसरीकडे तुकाराम मुंढे यांनी अतिरिक्त कामाचा भार टाकल्याचे आरोप स्पष्टपणे फेटाळले आहेत. त्यामुळे या प्रकरणात पुढे प्रशासन किंवा खात्याचे मंत्री कोणती भूमिका घेतात, हे महत्त्वाचे ठरणार आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.