तुकाराम मुंढे यांच्या विभागातील रिक्त पदे पाहून बसेल धक्का
'MPSC'नेच केली सरकारची पोलखोल...
मुंबई : खरा पंचनामा
धडाकेबाज IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली अन्न व औषध प्रशासन विभागाने महाराष्ट्रातील भेसळमाफियांचे कंबरडे मोडले आहे. अन्नपदार्थ, दूधभेसळीची अनेक रॅकेट त्यांनी उद्ध्वस्त केली आहेत.
त्यामुळे राज्यभर मुंढे यांच्या कामाचे कौतुक होत आहे. पण दुसरीकडे त्यांच्या विभागातील रिक्त पदांचे वास्तवही धक्कादायक आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडूनच याबाबतची माहिती देण्यात आली आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे सचिव महेंद्र हरपाळकर यांचा महासंवाद या राज्य सरकारच्या अधिकृत पोर्टलवर लेख प्रसिध्द झाला आहे. यामध्ये त्यांनी ऑनलाईन परीक्षांवरून सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर आयोगाची भूमिका सविस्तरपणे मांडली आहे. या लेखामध्येच त्यांनी सरकारच्या काही विभागांतील रिक्त पदांची माहितीही दिली आहे.
तुकाराम मुंढे यांच्या एफडीए या विभागातील औषध निरीक्षक विभागातील तब्बल ८० टक्के पदे रिक्त असल्याची माहिती हरपाळकर यांनी दिली आहे. हरपाळकर यांनी लेखात म्हटले आहे की, प्रचलित पद्धतीमध्ये अनेकदा परीक्षेचा संपूर्ण कालावधी अडीच ते तीन वर्षांपर्यंतदेखील चालतो. या काळात असे लक्षात आले आहे की, एकच विद्यार्थी, उदा., २०२५ ची पूर्व परीक्षा देतो, २०२४ ची मुख्य परीक्षा देतो व त्याच वेळी मुलाखतीदेखील देत असतो. अशा चक्रव्यूहात अडकलेले विद्यार्थी प्रचंड मानसिक तणावात असतात. याशिवाय, त्यांना त्यांच्या करिअर व जीवनाचे नियोजन करता येत नाही.
एकूण निवड प्रक्रियेची कालमर्यादा सीमित नसल्यामुळे बरेचदा अनेक होतकरू विद्यार्थी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेकडे पाठ फिरवून व्यवसायाचे इतर मार्ग निवडतात. यामुळे राज्य शासनालादेखील चांगल्या अधिकाऱ्यांच्या सेवा उपलब्ध होत नाहीत. निवड प्रक्रियेच्या कालमर्यादेतील अनिश्चिततेमुळे शासनाची पदे मोठ्या प्रमाणात रिक्त राहतात.
रिक्त पदांची संख्या काही विभागांत ८० टक्क्यांपर्यंत देखील आहे. उदा. पशुसंवर्धन विभागातील पशुधन विकास अधिकारी संवर्गामध्ये जवळपास ३ हजार १०० पदांपैकी २ हजार ९६० पदे रिक्त आहेत. अन्न व औषध प्रशासन विभागातील औषध निरीक्षक विभागामध्ये ८० टक्के पदे रिक्त आहेत. जिल्हा सैनिक कल्याण अधिकाऱ्यांची ३६ पैकी ३६ पदे रिक्त आहेत. अशी अनेक उदाहरणे देता येतील, असे हरपाळकर यांनी लेखात नमूद केले आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.