सायबर फसवणुकीतील सुमारे पावणेपाच लाख रुपये 'MRM' द्वारे केले जप्त
सांगली सायबर पोलिसांची मोठी कारवाई; पैसे परत मिळण्यास सुरुवात
पूजा फडके
सांगली : खरा पंचनामा
डिजिटल युगात वाढत्या सायबर गुन्हेगारीला वेसण घालण्यासाठी आणि नागरिकांना न्याय देण्यासाठी सांगली सायबर पोलीस ठाण्याने एक मोठी आणि दिलासादायक कामगिरी केली आहे. केंद्र सरकारच्या 'MRM' (Money Restoration Module) या नवीन पोर्टलचा प्रभावी वापर करत, सायबर पोलिसांनी जून २०२६ पासून आतापर्यंत विविध गुन्ह्यांत होल्ड केलेली ४ लाख ७७ हजार ८८७ रुपये रिफंड करण्याची प्रक्रिया पूर्ण केली आहे. यापैकी ३ लाख ८५ हजार ३६५ रुपये आधीच तक्रारदारांच्या बँक खात्यात यशस्वीरित्या परत जमा करण्यात आले आहेत.
काय आहे 'MRM' पोर्टल?
अलीकडच्या काळात नागरिकांची ऑनलाईन आर्थिक फसवणूक होण्याचे प्रमाण वाढले आहे. अशा वेळी नागरिक राष्ट्रीय सायबर हेल्पलाईन नंबर १९३० किंवा www.cybercrime.gov.inवर त्वरित तक्रार नोंदवतात. या तक्रारींनंतर सायबर पोलीस तातडीने कारवाई करून फसवणुकीची रक्कम संशयित बँक खात्यांमध्ये 'फ्रीज' (गोठवून) ठेवतात. अशी गोठवलेली ५० हजार रुपयांपर्यंतची रक्कम थेट मूळ तक्रारदाराच्या खात्यात परत जमा करण्यासाठी भारत सरकारने 'MRM' (Money Restoration Module) हे नवीन पोर्टल सुरू केले आहे. सांगली सायबर पोलीस ठाण्यामार्फत बँकांच्या समन्वयाने ही रक्कम थेट नागरिकांना मिळवून दिली जात आहे.
वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई
ही धडक कारवाई सांगलीचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक स्नेहा गिरी आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक रूपाली बोबडे यांनी केली. तसेच या मोहिमेत पोलीस अंमलदार सतिश आलदर, करण परदेशी, रेखा कोळी, रूपाली पवार, अजय पाटील, अभिजित पाटील, शांतव्वा कोळी, विजय पाटणकर, इम्रान महालकरी, कॅप्टन गुंडवाडे, अजय बेंदरे आणि दिपाली नेटके या संपूर्ण सायबर टीमने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.
पोलीस निरीक्षक स्नेहा गिरी यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, जर तुमची ऑनलाईन आर्थिक फसवणूक झाली असेल, तर त्वरित '१९३०' वर किंवा सायबर पोर्टलवर तक्रार नोंदवावे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.