नीलेश गडदे, गुंड म्हमद्या नदाफसह नऊ जणांवर मोका अंतर्गत कारवाईचा प्रस्ताव सादर
पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांची माहिती : वेदांत बंडगर खून प्रकरण
सांगली : खरा पंचनामा
वेदांत बंडगर खून प्रकरणी मुख्य सुत्रधार नीलेश गडदे, कुख्यात गुंड म्हमद्या नदाफसह नऊ जणांवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी अधिनियम (मोका) नुसार कारवाई करावी, असा प्रस्ताव कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक रंजनकुमार शर्मा यांच्याकडे हा प्रस्ताव देण्यात आला आहे, अशी माहिती अधीक्षक तुषार दोशी यांनी दिली.
संशयित नीलेश गडदे, म्हमद्या नदाफ, किरण लोखंडे, संदेश घागरे, अतुल वायदंडे, मलीक शेख, विशाल चौगुले, सागर चौगुले यांचा त्यात समावेश आहे. मिरज तालुक्यातील रेल्वेच्या मालधक्क्याच्या कामावरून खरात-गडदे गटांत वाद होता. हे काम लक्ष्मण खरात यांच्याकडे आहे. खरात यांनी हे काम सोडावे, म्हणून संशयित नीलेश गडदे दबाव आणत होता. १० जूनला रात्री सातला गडदे याने दोन साथीदारांसह खरात यांच्या घरी जाऊन त्यांच्या पत्नीला धमकावून खंडणीही मागितली. ही माहिती मिळताच हमाल पंचायतीचे नेते बाळासाहेब बंडगर जत येथे गेले.
गडदेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यासाठी हमाल जमताच दोन गट समोरासमोर आल्याने तणाव निर्माण झाला. संतप्त हमालांनी गडदे समर्थकांच्या गाडीवर दगडफेक केली. त्याच रागातून गडदे याने बाळासाहेब बंडगर यांना मारण्यासाठी सांगली गाठली. त्यावेळी अंगणात मोबाईल पाहत बसलेला बंडगर यांचा नातू वेदांतवर गोळी झाडली. त्यात त्याचा मृत्यू झाला.
त्यानंतर पोलिसांनी गडदेसह साथीदारांच्या मुसक्या आवळल्या. काही संशयितांना अद्याप ताब्यात घेतले नाही. त्यांना लवकर ताब्यात घेतले जाईल. तोपर्यंत या टोळीविरोधात मोका कारवाईचा प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना अधीक्षक दोशी यांनी एलसीबीचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांना दिले होते. त्यानुसार प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. त्याला मंजूर मिळताच अंमलबजावणी केली जाईल, असेही अधीक्षक दोशी यांनी सांगितले.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.